Tuesday, November 22, 2016

साले...चोर कुठले...


ह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बोलतोय ते पेट्रोल भरणाऱ्या चोरांबद्दल जे पेट्रोल पंपावर आपलं ''कर्तव्य'' निभावत असतात.

किस्सा असा कि माझ्या घराजवळच्या पेट्रोल पंपावर माझं भांडण झालं (४-५ वेळी) म्हणजे, ० रिडींग न दाखवणे, मधेच मागून कुणी 'बिल पाहिजे का?' असं बोलून लक्ष विचलित करणे वगैरे कारणांवरून.
वाटलं जरा पेट्रोल पंप बदलूया (जास्त अपेक्षा न ठेवता, कारण सगळी कडे असे चोर भरलेले आहेतच). मग चिंचवडला हायवे जवळ असलेल्या पंपावर जायला लागलो. १-२ वेळा ठीक वाटलं. तिसऱ्या वेळी गेलो, तीनदा म्हणालो ५०० चं टाक. त्याने टाकलं १००चं. हि ह्या चोरांची जुनी युक्ती. १०० म्हणून त्याने १ रुपयाचं सुद्धा भरलं नाहीये ते मला कळलं. माझी चांगलीच सटकली.
मी झालो सावध, त्याला फक्त हातवारे करून म्हणालो कि हे काय केलं? त्याने असा चेहरा केला कि अरेरे चुकून झालं.
...अरे साहेब मला १०० ऐकू आलं. १५० चं भरू का?
का रे? किती येतं १५० मध्ये?
...२ लिटर
कर तर हिशोब...२ लिटरला १५४ लागतात. वरचे तू टाकणार का?
त्याच्या कडे उत्तर नव्हतं. कसं असणार. त्याला कळलं कि चोरी पकडली गेली.
मग त्याने टाकलं ४०५ रुपयाचं पेट्रोल...अजून एक जुनी युक्ती (मुद्दामून थोडंस जास्त टाकणे) .
त्याला म्हणालो टोटल कितीचं टाकलं रे?
..५०५ चं साहेब
...परत हे वरचे ५ रुपये तू टाकणार का? काय कारण?
माझा आवाज वाढला कारण मला सहनच होईना. आजू बाजूचे लोकं बघायला लागले.
म्हणालो...चल पूर्ण पेट्रोल काढ गाडीतून, मोजून दे मला. चोरलं नसेल तर सगळ्या लोकांसमोर तुझी माफी मागेल.
त्याला सगळं कळलं होतं..त्याचा चेहरा थोडा पडला.
मी पण जे होईल ते बघूचं असं ठरवून गाडी मॅनेजर च्या केबिन समोर लावली. सगळ्यांना सांगितलं कि मला पेट्रोल मोजायचं आहे. मागून तो आला थोडं गया वया करू लागला.
...साहेब जरा प्रॉब्लेम चालू आहे घरी, लक्ष नव्हतं (वगैरे वगैरे).
...ते मला नको सांगू. कितीचं पेट्रोल मारलं ते सांग?
तो काही बोलेना आणि पेट्रोल काढून मोजायला पण तयार होईना. मग निघून गेला कारण मागे लाईन वाढली होती. तेव्हड्यात मॅनेजर साहेब आले. मी त्यांना किस्सा सांगितला.
त्यांना पण कळून चुकलं कि चोरी झालीये म्हणून. ते म्हणाले साहेब पैसे नका देऊ, जा तुम्ही.
मी म्हणालो मला पण काही फुकट नाही पाहिजे. त्याला विचारा कि खरंच कितीचं भरलंय, तेव्हडे पैसे देतो मी.
मॅनेजर म्हणाला... साहेब तुमचे पण पैसे काही फुकट नाही आलेत तुम्हाला कमवावे लागतातच ना? मी त्याच्या पगारातून कापून घेतो, जरा घडू दे त्याला अक्कल. जा तुम्ही.
मी परत पैसे देण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. मग म्हणालो असो...
मी निघणार तेव्हड्यात तो चोर आला...म्हणालो तुझ्या मॅनेजरशी बोल आणि निघून गेलो.

असो. विषय हा कि सकाळी सकाळी आपण घाईत असतो आणि त्यातल्या त्यात कुणी आपल्या समोर आपल्याला फसवतोय आणि आपण काहीच करू नाही शकत? फार वेदना दायक गोष्ट आहे हि. जर आपल्याला नाही कळलं कि पेट्रोल मारलं गेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर का आपल्याला कळलं, कि पेट्रोल मारल्या गेलं आहे मग दिवसभर मनाची तळमळ सुरु असते. विषय त्या ३०-४० रुपयांचा नसतो तर मला कुणी तरी फसवलं आहे ह्या ग्लानीचा असतो. हा अनुभव फार वेदनादायक आहे. हा जरा जुना किस्सा होता, ह्या नंतर माझं चिंचवड, हिंजवडी, खराडी इथल्या बहुतेक पेट्रोल पंपावर भांडण झालंय. तुम्हाला माहित नसेल पण हे लोक दिवसाचे २-३ हजार असेच कमवतात (पगारा व्यतिरिक्त)    

इथे मी लिहू शकतो म्हणून ह्या चोरांच्या काही युक्त्या तुम्हाला सांगतो, आशा करतो कि तुम्हाला पटेल.
१. १०० म्हटलं कि म्हणतात ११०-१२० चं भरू का? वरचे १०-२० मारण्यासाठी असतात (एव्हाना १०० मधून तुमचं पेट्रोल त्याने मारलं असेल पण. कारण ज्याला प्रामाणिक पणाने पेट्रोल भरायचं आहे तो असं काहीच विचारत नाही)
२. तुम्ही ५०० म्हणाले आहे त्याने १०० चं टाकलं तर समजून घ्या कि तुमचं १०० चं पेट्रोल मारलंय. अगदी १००%.
३. पेट्रोल भरत असतांना... बिल पाहिजे का? म्हणणारे नेहमी पाठी मागूनच येतात. तुमचं लक्ष गेलं तर पेट्रोल गेलंचं समजा.
४. पेट्रोल भरत असतांना त्याने अचानक ट्रिगर दाबणे आणि तिथून पुढे परत भरण्यास सुरु करणे. (सेन्सर मुळे ट्रिगर आपोआप बंद होतो,  आपोआप झाल्यास काही प्रॉब्लेम नाही. त्याने बंद केल्यास समजून घेणे)
५. पेट्रोल भरत असताना ते मुद्दामून लक्ष विचलित करतात उदा. अरे साहेब हा स्क्रॅच कधी पडला? तुम्ही तिकडं बघितलं रे बघितलं तर गेलंच तुमचं पेट्रोल.
६. ५०० ऐवजी ५०३-५०४ चं टाकलं तर समजा त्याने पेट्रोल मारलंय. मित्रांनो आपल्याला फुकट पेट्रोल देणारा तो इतका काही मूर्ख नाहीये. आपल्याला वाटतं अरे ३ रुपयाचं याने जास्त भरलंय, फायदाच झाला कि आपला. आपण खुश होतो आणि निघून जातो. जर का चेक करायचा असेल ना तर त्याला म्हणा कि कॉम्पुटर रिसिप्ट दे? बघा किती घाबरतो तो.  

मित्रांनो आपले अधिकार जाणून घ्या. तुम्हाला वाटलं कि पेट्रोल चोरी झाली आहे  तर तुम्ही ते पेट्रोल काढून त्यांच्या कडून मोजून घेऊ शकता. सीसी टीव्ही बघू शकता. सगळ्यात महत्वाची ती कॉम्पुटर रिसिप्ट आहे. तिच्यात अगदी किती पेट्रोल भरलं आणि त्याची किंमत किती होते अशी माहिती छापून येते. सगळेच चोर नसतात पण पेट्रोल पंपावर कायम सावध राहा. इथे घाई नकोच.

काय करणार यार आपण सामान्य मनुष्य आहोत पण आपल्यालाच त्रास जास्त होतो त्यामुळे एकमेकांना अशी माहिती देऊन आपली होत असलेली लूट थाम्बवण्याचा पयत्न करूया.
   

     


No comments:

Post a Comment