Sunday, July 3, 2016

पाऊस असा रुणझुणता...

3-4 दिवसांपासून पावसाने बराच जोर धरला होता. अगदी शांतपणे त्याच बरसंन चालू होतं. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक मोठं अशोक झाड आहे. ते अगदी शांत पणे उभं होतं पाऊस अंगावर घेत. वारा अजिबात वाहत नव्हता. सगळी कडे शांतता. दुपार असल्याने वाहने देखील कमी होती  रस्त्यावर. फक्त पावसाचा स्स्स्स्स आवाज येत होता. ते झाड जोरात डोलत नव्हतं. कधीतरी झाडाच्या फांद्या हळुवार हलायच्या. असं वाटत होतं की त्या पावसाला हळूच इशारा करत होत्या, अनुमोदन देत होत्या की असाच बरसत रहा

पाण्याचे नाजूक थेम्ब पानांवर पडत होते, त्या क्षणा   पुरतं ते पान जोरात हलायचं आणि मग हळूच तो थेम्ब घसरून पानाच्या टोकावर यायचा. काही क्षणापुरता तेथेच रेंगाळत रहायचा. त्याची खाली पडण्याची इच्छाच होईना. शेवटी आपले रूप खुलवून दाखवत तो थेम्ब काही क्षणापुरता तेजोमय व्हायचा आणि झोका घेत खाली कोसळायचा

ते संपूर्ण झाड थोडं वाकून गेलं होतं, त्याच्या फांद्या आणि सगळी पाने देखील. पण रंग मात्र उजळला होता. असं वाटत होतं की त्या झाडाने स्वतःला अगदी समर्पित करून टाकलं होतं त्या पावसासमोर. जसं की एखादा प्रियकर आपल्या प्रियेसीचा अंगावर रंग उधळत होता आणि तिला देखील ते आवडत होतं. तिने लाजून मान खाली घातलेली होती आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. अंग अगदी ओलंचिंब झालं होतं पण मन अजून भरलेलं नव्हतं. ती हळूच चोरून त्याच्या कडे बघत होती आणि त्याने परत रंग टाकला तर लाजून मान फिरवत होती. मनात एकाच विचार की तू असाच रंग उधळत रहा माझ्यावर. कधी हळुवार तर कधी खुपसारे एकसाथ. असच पावसाचं चालू होतं कधी हळू तर कधी तो वेगात बरसत होता. आणि ते झाड अगदी शांतपणे उभं, कारण त्याला पण ते हवंच होतं.No comments:

Post a Comment