Sunday, July 10, 2016

पुणेरी फटका


मी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी रिकाम्या वेळेत ते असे किस्से सांगतात. त्यांच्या सोसायटीत फक्त 5-6 फ्लॅट आहेत. केदार सर सोडून सगळे लोक रिटायर्ड आणि जरा वयस्करच आहेत. सगळे मिळून 12-15 लोकं असतील. तरीही सगळ्यांना सांभाळणं किती अवघड आहे याचा  खालील किस्से वाचून तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल. 

किस्सा 1 - काका लाईट बंद का करतात ?
काही दिवसांपासून शेवटच्या आणि पहिल्या मजल्या वरचे काका यांची झाली दुश्मनी, म्हणजे ते एकमेकांशी बोलेना झाले. याचं कारण ऐका. ते असं की शेवटच्या मजल्यावर राहणारे काका सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी लवकर उठतात अगदी 5 ला आणि बाहेर निघतात. घरातून निघतांना ते प्रत्येक मजल्या वरचे लाईट बंद करत जातात. छोटीशी सेवा. पण यावर कुणाला काही ऑब्जेक्शन असायला हवं का? पण पहिल्या मजल्यावरचे काका चिडले. का तर ते म्हणतात माझ्या मजल्या वरची लाईट तुम्ही का बंद करतात. मीच ती बंद करणार. त्या बटणाला माझ्या शिवाय कुणीच हात लावायचा नाही. दोघांची चांगलीच जुंपली. इतकी की एकमेकांकडे ते बघत पण नाही यार. 

किस्सा 2- काकू रस्त्यावर गाडी लावू देत नाहीत 
आपण आपल्या सोसायटीत गाडी कुठे लावावी ह्या बाबत नियम पाळणे नक्कीच आवश्यक आहे कारण त्या जागेचा मालक तुमच्या वर ओरडू शकतो आणि विषय वाढू शकतो. सहसा असं कुणी करणार नाही. पण जर का तुम्ही रस्त्यावर जे अलिखित नियम आहेत ते पाळत नीट गाडी लावत आहात अगदी तुमच्या सोसायटी बाहेरच तर यावर सोसायटी मधल्या कुणाला काही आक्षेप असायला हवा का? नाही ना... 
एक काकू एका ड्रायव्हर ला रस्त्यावर एका ठिकाणी गाडी लावू देत नव्हत्या कारण..कारण की ती जागा त्यांच्या फ्लॅट पासून अगदी जवळ आहे. म्हणजे त्या घरातून निघाल्या की लगेचच गेट बाहेर गाडीत जाऊन बसू शकतात अशी ती जागा आहे. त्यामुळे त्यांची गाडी सोडून त्या तिथे कुणाला दुसऱ्याला गाडी लावू देत नाहीत किव्वा लावल्यास ओरडतात. रस्त्यावर पण आपला मालकी हक्क दाखवायला कमी नाही पडल्या त्या. तुम्हीच सांगा कसं होणार यांचं ? आणि केदार सांगतात की हे लोक अगदी स्पष्ट आणि इतक्या आत्मविश्वासाने बोलतात की समोरच्याला खरंच आपण काही चूक केली आहे असं वाटतं.

पाण्याची मोटर कधी लावली ह्यावरून चाललेल्या एका चर्चेत एक काकू म्हणाल्या की आमच्या ह्यांना साठवून ठेवलेलं पाणी आवडत नाही. त्यांना नळातून भरलेल्या बादलीच्या पाण्याने आंघोळ करायला आवडते...... आत्ता बोला ह्यावर. 
पाण्याविषयी भरपूर गोंधळ असतात सगळीकडे. आता सगळ्यांनी ठरवलं होतं की एकाच वेळी पाण्याची मोटर चालणार, तरी काही काका काय करतात की ते एक बारीक काठी घेतात आणि अगदी निशाणा लावून लोखंडी कपाटात बंद असलेल्या मोटारीचे बटन अगदी कौशल्य पूर्ण चालू करतात अगदी त्यांना वाटेल तेव्हा....... नुसता कहर आहे हो... :) 

अजून भरपूर किस्से आहेत जे सांगतांना केदार यांना हसू कंट्रोलच करता येत नाही. 

खरं तर असे लोकं अगदी सगळी कडे असतात म्हणजे आमच्या इथेही एक व्यक्ती 24 तास प्यायचे पाणी का पाहिजे ह्या साठी म्हणतो की मला रोज जेवतांना नळातून तांब्या भरून घ्यायची सवय आहे. बघा. पुणेकर ह्या विषयी प्रसिद्ध आहेतच :) पण काही लोकांचा स्वभावच असा असतो आणि स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. असो.... पण मग ज्या लोकांना रोज अश्या काही काका काकुंशी लढायचे असते त्यांना देव शक्ती देवो अशीच प्रार्थना.   
Sunday, July 3, 2016

पाऊस असा रुणझुणता...

3-4 दिवसांपासून पावसाने बराच जोर धरला होता. अगदी शांतपणे त्याच बरसंन चालू होतं. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक मोठं अशोक झाड आहे. ते अगदी शांत पणे उभं होतं पाऊस अंगावर घेत. वारा अजिबात वाहत नव्हता. सगळी कडे शांतता. दुपार असल्याने वाहने देखील कमी होती  रस्त्यावर. फक्त पावसाचा स्स्स्स्स आवाज येत होता. ते झाड जोरात डोलत नव्हतं. कधीतरी झाडाच्या फांद्या हळुवार हलायच्या. असं वाटत होतं की त्या पावसाला हळूच इशारा करत होत्या, अनुमोदन देत होत्या की असाच बरसत रहा

पाण्याचे नाजूक थेम्ब पानांवर पडत होते, त्या क्षणा   पुरतं ते पान जोरात हलायचं आणि मग हळूच तो थेम्ब घसरून पानाच्या टोकावर यायचा. काही क्षणापुरता तेथेच रेंगाळत रहायचा. त्याची खाली पडण्याची इच्छाच होईना. शेवटी आपले रूप खुलवून दाखवत तो थेम्ब काही क्षणापुरता तेजोमय व्हायचा आणि झोका घेत खाली कोसळायचा

ते संपूर्ण झाड थोडं वाकून गेलं होतं, त्याच्या फांद्या आणि सगळी पाने देखील. पण रंग मात्र उजळला होता. असं वाटत होतं की त्या झाडाने स्वतःला अगदी समर्पित करून टाकलं होतं त्या पावसासमोर. जसं की एखादा प्रियकर आपल्या प्रियेसीचा अंगावर रंग उधळत होता आणि तिला देखील ते आवडत होतं. तिने लाजून मान खाली घातलेली होती आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. अंग अगदी ओलंचिंब झालं होतं पण मन अजून भरलेलं नव्हतं. ती हळूच चोरून त्याच्या कडे बघत होती आणि त्याने परत रंग टाकला तर लाजून मान फिरवत होती. मनात एकाच विचार की तू असाच रंग उधळत रहा माझ्यावर. कधी हळुवार तर कधी खुपसारे एकसाथ. असच पावसाचं चालू होतं कधी हळू तर कधी तो वेगात बरसत होता. आणि ते झाड अगदी शांतपणे उभं, कारण त्याला पण ते हवंच होतं.