पहिला भाग इथे वाचा
पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त करून शेती होती आणि जेथे शेती नाही तेथे होती हिरव्या गवताची कुरणं. ती असंख्य गवताची पाती समुद्रात उठणाऱ्या पाण्याच्या लहरिन्प्रमाने लहरत होती. अगदी हिरव्या लहरी वाटत होत्या त्या. तिथला गार वारा नुसती ती गवताची पाती नाही तर माझं मन देखील डोलवत होता...आनंदाने.
आता मागे सांगितल्या प्रमाणे खरा माळशेज घाट सुरु झाला. रस्ता चांगला होता आणि हळूहळू उंचावर पोहोचलो आहोत असा फिलिंग यायला लागला कारण आता माझ्या उजव्या बाजूला खोल दरी होती आणि तिच्या पुढे ताट मान करून आणि हिरवा कोट घातलेले मोठ मोठे पर्वत. काही क्षण तुमची नजरच हटणार नाही असे काही. आता प्रवास होता मोठ मोठ्या पर्वतांच्या माळेतून आणि हिरव्या गार निसर्गातून. असे मोठे डोंगर अगदी नजर पोहोचत नाही तिथ पर्यंत पोहोचलेले, असा नजारा तुरळकच पाहायला भेटतो. काही वळणांवरून आपण घाटाचे रुद्र रूप पाहू शकतो. लांबून पाहून खरच भीती वाटते, पण त्याच्या जवळ गेल्यास तो आपल्याला तितकाच सुंदर वाटतो. काही ठिकाणी प्रवाश्यांना निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी खास जागा बनवलेल्या. तिथून हे काही फोटो काढले, घाटाचे आणि निसर्ग सौंदर्याचे. घाटात भरपूर अश्या जागा होत्या कि तेथे गाडी वरून उतरून हि जागा बघितलीच पाहिजे आणि इथला फोटो काढलाच पाहिजे असा फिलिंग आला. जितकं जमेल आणि जेथे जमेल तिथे मी थांबलो आणि डोळ्यात व क्यामेऱ्यात ते सौंदर्य भरून भरून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. हा घाटातला प्रवास असाच चालू राहावा असा अगदी मनापासून वाटत होतं पण...असो. सांधण दरी राहून जायची, म्हणून मना आवरत घेतलं.
माळशेज घाट, खरच न विसरण्यासारखा आणि परत नक्की येण्यासारखा :) जे लोकं ह्या रस्त्याने (नगर कल्याण हायवे) नेहमी प्रवास करतात, त्यांच्या सारखा आनंदी, उल्हासि, मजेशीर, न थकवणारा प्रवास क्वचितच कुणाचा होत असेल. असो.
घाट संपल्या नन्तर अगदी झकास रस्ता लागला, दोन्ही बाजूने घनदाट झाडी असलेला. हा हायवे सरळ कल्याण ला जातो. मला जायचं होतं उजव्याबाजूला, म्हणून काही अंतराने नंतर हायवे सोडून उजव्या बाजूला वळालो. तेथून भरपूर छोट्या वाड्या, खेडी ओलांडत डोळखांबला पोहोचलो. हायवे वरून इथे पोहोचता पोहोचता मी जवळ पास २५-३० किमी गाडी चालवली होती आणि नंतर मला अंदाज आला कि लोकं ठाणे जिल्ह्याचं विभाजन का करायला बघत आहेत. कारण ज्या एरियातून मी जात होतो तो पूर्णपणे आदिवासी एरिया होता. काहीच विकास नाही. दूर दूर पर्यंत मोठ मोठे डोंगर दिसत होते, मधेच छोट्या छोट्या अनेक नद्या लागल्या, आणि त्यांच्यावर मासे पकडत असलेले भरपूर आदिवासी जोडपे दिसले. रस्ता कुठे चांगला कुठे वायीट. मला कळतच नव्हतं इथल्या लोकांच जीवन कसं चालत ते. जे ठाणे आपल्याला दिसतं त्याच्या अगदी विरुद्ध इथलं चित्र होतं. विभाजन झालं तर काही होयील तरी. म्हणजे तशी आशा तरी करू. मला जायचा होतं घाटघर धरणावर, कारण तिथून सांधण दरी अगदी जवळच होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं मोठं घाटघर धरण कुणालाच माहित नव्हतं. कुणाला म्हणजे कुणा लाच नाही. मला यायला लागलं टेन्शन कि च्यायला कुणालाच कसं माहित नाही हे धरण. दुसरं ऑप्शन नसल्याने गुगल ने सांगितल्या प्रमाणे मार्गक्रमण करत होतो. मग फार पुढे एका व्यक्तीने 'कुणालाही चौन्ढा प्रकल्प असं विचारा कुणीही सांगेल, तोच घाटघर प्रकल्प आहे' असं सांगितलं. असा इशु होता तर, पुढे मग चौन्ढा प्रकल्प विचारत गेलो आणि सगळे व्यवस्थित मार्ग दाखवायला लागले. पोहोचलो एकदाचं चौन्ढ्याला. पण तिथे पोहोचल्यावर कळल कि साम्रद गावाला (सांधण दरीला) जायचा रस्ता आहे इथून पण गाडी नाही नेता येणार, कारण ते गाव समोर असलेल्या डोंगरा पलीकडे आहे. जर का गाडी घेऊन जायचं असेल तर १०० किलोमीटर लांबून जावं लागेल म्हणजे कसारा-इगतपुरी-भंडारदरा या मार्गाने. घ्या आता कळूनच चुकलं होतो कि मी चांगलंच चुकलो आहे. पण परत १०० किमी गाडी चालवण्याची ताकद नव्हती कारण ओल्रेडी १८० किमी गाडी चालवून झाली होती. मग वाटलं कि हा डोंगर चढून जाणे सोपे आहे, इतकी गाडी चालवण्यापेक्षा.
मग आलो धरणावर. तिथली सिक्युरिटी गार्ड्स फारच चांगली मानसं निघाली. त्यांनी सांगितलं गाडी येथेच लावा आणि जा, काही प्रोब्लेम नाही. त्याप्रमाणे केलं, आणि एक तर माझ्या बरोबर पुढे पर्यंत आला डोंगरावरची वाट दाखवायला. एव्हाना माझे मित्र दत्ताच्या घरी (साम्रद गावी) येउन पोहोचले होते, त्यांना म्हणालो कि तुम्ही पुढे निघा मी पोहोचतोच मागून. साम्रद गावाला पोहोचण्यासाठी मला जो त्रास झाला तो काही येथे लिहित नाही. पण एक गोष्ट नक्की कि मी ह्या अनुभवातून चांगलंच शिकलो...असो.
हाच तो रतनगड |
Very pleasant travel towards nature!
ReplyDelete