Thursday, July 18, 2013

सांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2


पहिला भाग इथे वाचा

पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब  पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त करून शेती होती आणि जेथे शेती नाही तेथे होती हिरव्या गवताची कुरणं. ती असंख्य गवताची पाती समुद्रात उठणाऱ्या  पाण्याच्या लहरिन्प्रमाने लहरत होती. अगदी हिरव्या लहरी वाटत होत्या त्या. तिथला गार वारा नुसती ती गवताची पाती नाही तर माझं मन देखील डोलवत होता...आनंदाने.
त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूला थोडं दूर तो हरिश्चंद्र गड, स्पष्ट दिसत होता, विस्तीर्ण असा, शांतपणे उभा, कित्तेक शतकांपासून. छान प्रवास चालू होता. माझ्या चारही बाजूला निसर्गाचे अप्रतिम नजारे होते. दोन डोळे कमी पडत होते हो सगळी कडे बघायला. 

आता मागे सांगितल्या प्रमाणे खरा माळशेज घाट सुरु झाला. रस्ता चांगला होता आणि हळूहळू उंचावर पोहोचलो आहोत असा फिलिंग यायला लागला कारण आता माझ्या उजव्या बाजूला खोल दरी होती आणि तिच्या पुढे ताट मान करून आणि हिरवा कोट घातलेले मोठ मोठे पर्वत. काही क्षण तुमची नजरच हटणार नाही असे काही. आता प्रवास होता मोठ मोठ्या पर्वतांच्या माळेतून आणि हिरव्या गार निसर्गातून. असे मोठे डोंगर अगदी नजर पोहोचत नाही तिथ पर्यंत पोहोचलेले, असा नजारा तुरळकच पाहायला भेटतो. काही वळणांवरून आपण घाटाचे रुद्र रूप पाहू शकतो. लांबून पाहून खरच भीती वाटते, पण त्याच्या जवळ गेल्यास तो आपल्याला तितकाच सुंदर वाटतो. काही ठिकाणी प्रवाश्यांना निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी खास जागा बनवलेल्या. तिथून हे काही फोटो काढले, घाटाचे आणि निसर्ग सौंदर्याचे. घाटात भरपूर अश्या जागा होत्या कि तेथे गाडी वरून उतरून हि जागा बघितलीच पाहिजे आणि इथला फोटो काढलाच पाहिजे असा फिलिंग आला. जितकं जमेल आणि जेथे जमेल तिथे मी थांबलो आणि डोळ्यात व क्यामेऱ्यात ते सौंदर्य भरून भरून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. हा घाटातला प्रवास असाच चालू  राहावा असा अगदी मनापासून वाटत होतं पण...असो. सांधण दरी राहून जायची, म्हणून मना आवरत घेतलं.


माळशेज घाट, खरच न विसरण्यासारखा आणि परत नक्की येण्यासारखा :) जे लोकं ह्या रस्त्याने (नगर कल्याण हायवे) नेहमी प्रवास करतात, त्यांच्या सारखा आनंदी, उल्हासि, मजेशीर, न थकवणारा प्रवास क्वचितच कुणाचा होत असेल. असो.
घाट संपल्या नन्तर अगदी झकास रस्ता लागला, दोन्ही बाजूने घनदाट झाडी असलेला. हा हायवे सरळ कल्याण ला जातो. मला जायचं होतं उजव्याबाजूला, म्हणून काही अंतराने नंतर हायवे सोडून उजव्या बाजूला वळालो. तेथून भरपूर छोट्या वाड्या, खेडी ओलांडत डोळखांबला पोहोचलो. हायवे वरून इथे पोहोचता पोहोचता मी जवळ पास २५-३० किमी गाडी चालवली होती आणि नंतर मला अंदाज आला कि लोकं ठाणे जिल्ह्याचं विभाजन का करायला बघत आहेत. कारण ज्या एरियातून मी जात होतो तो पूर्णपणे आदिवासी एरिया होता. काहीच विकास नाही. दूर दूर पर्यंत मोठ मोठे डोंगर दिसत होते, मधेच छोट्या छोट्या अनेक नद्या लागल्या, आणि त्यांच्यावर मासे पकडत असलेले भरपूर आदिवासी जोडपे दिसले. रस्ता कुठे चांगला कुठे वायीट. मला कळतच नव्हतं इथल्या लोकांच जीवन कसं चालत ते. जे ठाणे आपल्याला दिसतं त्याच्या अगदी विरुद्ध इथलं चित्र होतं. विभाजन झालं तर काही होयील तरी. म्हणजे तशी आशा तरी करू.  
        
मला जायचा होतं घाटघर धरणावर, कारण तिथून सांधण दरी अगदी जवळच होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं मोठं घाटघर धरण कुणालाच माहित नव्हतं. कुणाला म्हणजे कुणा लाच नाही. मला यायला लागलं टेन्शन कि च्यायला कुणालाच कसं माहित नाही हे धरण. दुसरं ऑप्शन नसल्याने गुगल ने सांगितल्या प्रमाणे मार्गक्रमण करत होतो.  मग फार पुढे एका व्यक्तीने 'कुणालाही चौन्ढा प्रकल्प असं विचारा कुणीही सांगेल, तोच घाटघर प्रकल्प आहे' असं सांगितलं. असा इशु होता तर, पुढे मग चौन्ढा प्रकल्प विचारत गेलो आणि सगळे व्यवस्थित मार्ग दाखवायला लागले. पोहोचलो एकदाचं चौन्ढ्याला. पण तिथे पोहोचल्यावर कळल कि साम्रद गावाला (सांधण दरीला) जायचा रस्ता आहे इथून पण गाडी नाही नेता येणार, कारण ते गाव समोर असलेल्या डोंगरा पलीकडे आहे. जर का गाडी घेऊन जायचं असेल तर १०० किलोमीटर लांबून जावं लागेल म्हणजे कसारा-इगतपुरी-भंडारदरा या मार्गाने. घ्या आता कळूनच चुकलं होतो कि मी चांगलंच चुकलो आहे. पण परत १०० किमी गाडी चालवण्याची ताकद नव्हती कारण ओल्रेडी १८० किमी गाडी चालवून झाली होती. मग वाटलं कि हा डोंगर चढून जाणे सोपे आहे, इतकी गाडी चालवण्यापेक्षा.

मग आलो धरणावर. तिथली सिक्युरिटी गार्ड्स फारच चांगली मानसं निघाली. त्यांनी सांगितलं गाडी येथेच लावा आणि जा, काही प्रोब्लेम नाही. त्याप्रमाणे केलं, आणि एक तर माझ्या बरोबर पुढे पर्यंत आला डोंगरावरची वाट दाखवायला. एव्हाना माझे मित्र दत्ताच्या घरी (साम्रद गावी) येउन पोहोचले होते, त्यांना म्हणालो कि तुम्ही पुढे निघा मी पोहोचतोच मागून. साम्रद गावाला पोहोचण्यासाठी मला जो त्रास झाला तो काही येथे लिहित नाही. पण एक गोष्ट नक्की कि मी ह्या अनुभवातून चांगलंच शिकलो...असो.

हाच तो रतनगड
दत्ता मला त्या डोंगरावर घ्यायला आला होता, आणि नंतर काही मिनिटात मी पण पोहोचलो साम्रद्गावी. माझे मित्र मी सांगितल्याप्रमाणे पुढे निघून गेले होते. मी पण ५-१० मिनिट आराम केला आणि निघालो सांधण दरी कडे. फक्त दत्ता आणि मी.  जर चुकल्या सारखं वाटत होतं कारण जीवाभावाचे मित्र बरोबर नव्हते, म्हणून लवकरच त्यांना गाठायचं ठरवलं. दरी कडे जातांना समोरच हा रतनगड दिसला. भयंकर घाई होती तरी पण फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता. मागे ह्या गडावर गेलो होतो पण वेगळ्या रस्त्याने. असो..आता त्याच्या बद्दल विचार करण्याचा वेळ नव्हता. दत्ता जोरात चालला होता आणि मी देखील (फोटो काढत) :). अगदी काही मिनिटातच पोहोचलो सांधण दरीच्या तोंडाशी. हिच ती सांधण दरी जिला Valley of Shadows असे देखील म्हणतात. आता पुढचा प्रवास होता ह्या दरीतून खाली खाली जाण्याचा...





  

Sunday, July 7, 2013

सांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - १

सांधण दरी (Sandhan Valley)........ नुसता जीव जळायचा हो, जेव्हा जेव्हा गुगल किव्वा इतर मित्रांच्या ब्लॉगवर ह्या दरीचे फोटो पहायचो. किती वेळ नुसते ते फोटो बघत बसायचो मी. कधी जायीन कधी ती दरी बघेन असं व्हायला लागलं होतं.

असेच ब्लॉग वाचत असतांना दत्ता भांगरे याचा फोन नंबर भेटला (८६०५१५१६४१, ९३२५९२६३४१). लगेच त्याला फोन केला आणि सगळी माहिती घेतली. दत्ता हा साम्रद गावाचा रहिवाशी. सांधण दरी याच्या घरा पासून अगदी १०-१५ मिनिटाच्या अंतरावर. रतनगड, अलंग, मदन आणि कुलंग ई डोंगर हे देखील गावाच्या आजू बाजूच. तो म्हणाला कि खाण्याची, rappling करून खाली उतरवून द्यायची, परत गावात आणण्याची सगळी व्यवस्था करेन, प्रत्तेकी ६०० पर्यंत खर्च येयील. मेंबर वाढले तर पर हेड खर्च कमी होयील. पण पाऊस खूप आहे दरीकडे अजिबात जाता नाही येणार म्हणून आता नका येऊ असं पण म्हणाला. त्याने नोवेंबर मध्ये यायला सांगितलं. आता इतके दिवस वाट पाहिली, थोडे आणखी दिवस पाहू असं म्हणून तयारीला लागलो.  

मित्रांना सागितलं, जमवाजमव सुरु झाली. सगळे हो म्हणाले आणि सगळ्यांच्या सोयीचा विकेंड शोधला. सांधण दरी विजय सोडून बहुतेक जणांना माहित नव्हती. त्यामुळे सगळेच फार आनंदी आणि उत्साही झाले. उत्साहाचं दुसर कारण होतं कि फार दिवसांनी असे सगळे निघणार होतो. 


मग ते सगळे नाशिक वरून आणि मी पुण्या वरून येणार असं ठरलं, कारण नाशिकला जाऊन परत प्रवास नसता जमला मला (असं केलं असतं तर बर झालं असतं..असो.. सांगतो नंतर). तयारी झाली आणि शनिवार नक्की झाला. त्या शुक्रवारची रात्र फार मोठी वाटली, संपेचना हो. शेवटी माझी मीच पहाट केली :), तयार झालो, मित्रांना फोन केला, ते निघाल्याची खात्री केली, माझी Avenger काढली आणि निघालो. जवळ जवळ ५ वाजले होते. मी ज्या रस्त्याने जाणार होतो तो सांधण दरीकडे जाण्याचा खरा रस्ता नव्हता हे मला नंतर कळलं अगदी तिथे जवळ पोहोचल्यावर. मी पोहोचलो तिथे पण जरा उशिराने...असो. सविस्तर लिहितोच पुढे ह्या बद्दल. पण मित्रांनो एकच महत्वाची गोष्ट  सांगावीशी वाटते ती म्हणजे कि कुठेही नव्या ठिकाणी जाण्या पाहिले जरा माहिती काढा आणि मगच निघा. 

सकाळचा प्रवास लवकर होतो कारण रहदारी कमी असते, म्हणून लवकरच नारायणगावला पोहोचलो. बस डेपो पासून डावी कडे वळायचं, आणि २ मिनिटात तुम्ही जुन्नर च्या रस्त्याला लागतात. रस्ता तसा छान होता. २०-२५ मिनिटात जुन्नरला पोहोचलो आणि मुख्यचौकातून उजवीकडे वळालो. हा रस्ता गणेशखिंड मार्गे माळशेज घाटात जातो. गणेशखिंड - इथे पोहोचण्याचा रस्ता अगदी वळणावळणाचा होता. अंतर जरा कमी पण आजू बाजू अगदी घनदाट झाडी होती. मग पोहोचलो एकदाचं गणेश खीन्डीत. जरा उंचावरच पोहोचलो होतो आणि खरच खिंडीचाच प्रकार, म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला काळ्या दगडाचे डोंगर आणि मधून हा रस्ता. सकाळ पासून भरपूर गाडी चालवली होती, वाटलं थोडं थांबावं इथे म्हणून खिंड संपल्यावर बाजूला गाडी थांबवली. हेल्मेट काढलं, क्यामेरा काढला आणि समोर बघू  लागलो. समोरच दृश्य एका दृष्टीक्षेपात  मावणार नाही अस होतं म्हणजे उंच उंच डोंगर अगदी नजर पोहोचत नाही तिथ पर्यंत पसरलेले, मोठं धरण, डोंगराच्या कुशीत बसलेले गाव, घाटातला रस्ता आणि थोडं जंगल. सगळं काही होतं ह्या दृश्यात आणि ह्याला साथ होती गार रान वाऱ्याची आणि हलक्या धुक्याची. असं वाटत होतं कि हि गणेशखिंड आपल्याला सह्याद्री च्या कुशीत जाण्याचा मार्गच उघडून देत आहे..वाह अगदी अप्रतिम असं दृश्य होतं ते.   

काही फोटो काढले आणि लागलो पुढच्या मार्गाला. गणेश खिंडीचा घाट पार करतांना चांगलीच कसरत झाली म्हणजे गाडी चांगलीच हळू चालवावी लागली.  उतरलो घाट एकदाचा आणि लगेचच थोड्या पुढे एकदम झकास रस्ता लागला हो. वाह मग काय चांगलीच गाडी बुन्गवली. डाव्या  बाजू हिरवा निसर्ग, उजव्या बाजूला धरण असा रस्ता होता. काही वेळात माळशेज घाट लागणार होता. आज पर्यंत कधीच योग आला नव्हता ह्या रस्त्याने जायचा. खूप ऐकलं होतं भरपूर लोकांकडून कि अगदी झकास घाट आहे म्हणून एकदा तरी जायलाच पाहिजे. आज योग आला होता आणि मी पुरेपूर आस्वाद घेण्यास सज्य होतो.  


क्रमशः