Saturday, August 4, 2012

बारक्या...


मी एका जिम मध्ये जातो. तिथे भरपूर प्रकारचे लोक येतात. खरच फार वेग वेगळ्या प्रकारचे. जाड, बारीक, उंच, लहान. सगळे बिचारे जीव काढत असतात तिथे, पण प्रत्त्येकाच वेग वेगळं कारण असतं. जाड व्यक्तीला बारीक व्हायचा असतं तर बारक्याला जाड (मी कोणत्या श्रेणीत आहे हा विचार नका करू लगेच  :) ). काही स्वताहून येतात तर काही जबरदस्ती पाठवलेले. जे स्वतःहून येतात ते बिचारे प्रामाणिकपणे ट्रेनर जसं सांगत असतो त्या प्रकारचा व्यायाम करत असतात आणि काही लोकं तो एक तास कधी संपेल याची वाट बघत असतात.
        
असाच एक बारक्या मी रोज बघतो. मला काही त्याच्यावर जोक नाही मारायचे, किव्वा काही मुद्दामून नाही खेचायची आहे त्याची. पण तो ज्या प्रकारे वागतो किवा ज्या प्रकारचे किस्से होतात त्याच्या बरोबर ते पाहून मला फार हसू येत त्याचं. पहिले मी जरा त्याची वेश भूषा....वर्णन  सांगतो. तर हा बारक्या जरा उंच आहे ५.७/८ असेल. चेहरा लांबट, थोडा गव्हाळ वर्णाचा. अगदीच सडसडीत. तो कायम त्याची ती निळी चड्डी घालतो आणि हाफ टि शर्ट, तो पण फारच ढगळा. त्या शर्ट च्या बाह्या तो अगदी वर पर्यंत वळून घेतो. कॉलर कायम ताठ. त्याच्या टि शर्टच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे... 'बॉडीगार्ड'. 

जिम मध्ये एक नियम आहे, तों असा कि व्यायाम पूर्ण झाल्या शिवाय खाली बसायचं नाही. मास्तर फारच बॉडी बिल्डर आहे. त्यामुळे त्याला प्रतिउत्तर देण्याचा कुणाच्या मनात कधी विचार पण येत नाही. आणि विचार आलच तरी हिम्मत होतं नाही...असो. तर हा बारक्या सुरुवातीचा व्यायाम फार जोरात करतो म्हणजे रनिंग करणे, उड्या मारणे वगैरे वगैरे. पण नंतर...लपाछपीचा खेळ सुरु होतो. म्हणजे याच्या कडून पुढचा व्यायाम एवढा काही होत नाही, लगेच दमून जातो (किव्वा कंटाळा म्हणा...) म्हणून तो कुठे तरी बसायला बघतो. पण मास्तरला दिसला रे दिसला चांगलाच झापून काढतो तो, आणि मग शिक्षा  म्हणून जागीच ५० बैठका काढायला लावतो, एकाच दमात. मग हा बारक्या मास्तरच लक्ष कुठे आहे हे बघत बसतो. मग मास्तरची मान ज्या दिशेला असते त्याच्या विरुद्ध म्हणजे मागच्या दिशेला हा लगेच कुठे तरी बुड टेकून घेतो आणि घाबरलेल्या मांजरासारखा तिकडे बघत असतो. मास्तर जरा देखील हलला तर हा लगेच ताडकन उठतो आणि कुठल्या तरी मशीन शेजारी जाऊन उभा राहतो आणि अशी काय acting करतो हा.. असे काय हावभाव आणतो चेहऱ्यावर जसं आताच फार मोठं वजन उचलून खाली ठेवलं आणि लगेचच जवळच्या रुमालाला न आलेला घाम पुसायला लागतो. हा पहिलवान जर नाही ना झाला तर एक उत्कृष्ट कलाकार नक्कीच बनणार यात तीळ मात्र हि शंका वाटत नाही मला.

कुणी खाली बसलं तर लगेच मास्तरला दिसून जातं. मास्तर पण लई भारी आहे. मग ह्या वर बाराक्याने नवीन आयडिया काढली. ती म्हणजे जिम मध्ये असलेल्या खांबा मागे लपणे.  एक खांब अगदी पुरेसा आहे ह्याला लपण्यासाठी, आरामशीर लपून जातो हा. कधी कधी अगदी मास्तरच्या मागे असलेल्या खांबा मागे हा टेकून उभा असलेला मी बघितला आहे. असे भरपूर किस्से आहेत त्याचे. पण कधी कधी  व्यायाम करायला बघतो बर का हा बारक्या. आपल्या शरीराच्या दुप्पट वजन उचलू पाहतो. एकदा तो चेस्ट चा व्यायाम करत होता. त्यात एका बाकावर झोपून दोघी हातांनी स्टील चा बार उचलायचा असतो ज्याच्या दोन्ही टोकांवर वजनदार स्टीलच्या प्लेट असतात. मग बारक्याने दोन्ही टोकाला लावलं वजन. झाला आडवा त्या बाकावर आणि उचलला तो बार. थर थर  करत एक, दोन, तीनदा त्याने तो बार खाली वर उचलला आणि आता चौथ्या वेळेला खाली आणला पण..पण अहो त्याला तो वरच उचलता येयीना. खूप प्रयत्न करत होता तो अगदी तोंड वाकडं तिकडं करून, दात खाऊन ते वजन वर उचलण्याचा प्रयत्न करत होता पण अगदी व्यर्थ. आजूबाजूच्या मुलांना दिसलं हे लगेच पळाले हो त्याच्याजवळ आणि तिघांनी उचलून ते बाजूला केलं. मरायचीच वेळ होती. ती मुलं त्याच्या कडे..च्यायला काय आयटम आहे हा...!! अश्या मुद्रेने बघत तिथून निघून गेले. पण हा बारक्या...असं वागत होता जसं काही झालंच नाही. तो तिथून उठला आणि समोर असलेल्या आरश्या जवळ जाऊन छाती फुगवून बघू लागला किती इंच वाढली  म्हणून. नुसता कहर आहे हो.  

असे खूप किस्से आहेत हो त्याचे. पण इतकं सगळं होत असून सुद्धा नेहमी येतो बर का हा बारक्या व्यायाम शाळेत.  देव त्याच्या अथक प्रयत्नांना यश देवो हिच सदिच्छा.