Saturday, July 21, 2012

" विश्व मनाचे... "


"पहिले शुष्क वाटायच्या ह्या वाटा..
तुझ्याचमुळे यांस अर्थ गवसला ..
नव्हता इथल्या अवलोकनात रस ..
निरखतोय आनंदाने आज चहु बाजूला.."

"क्षणी दर क्षणी काय करत असशील तू..
याचाच आता असतो विचार ..
मनी माजलेय भासांचे तांडव..
अन प्रत्येक भासात असतो तुझाच आभास .."

"कसे बदलते आहे विश्व मनाचे .. 
उमजत नाही मज काही केल्या ?
रित्या रित्या ह्या मनाच्या भिंती..
आता तुझ्याच प्रतिमांनी भरून गेल्यात.."

Monday, July 16, 2012

'मिशन हरिश्चंद्र गड - ५'निघालो मग कोंकण कड्या च्या दिशेने. वाट छान होती म्हणजे, म्हणजे इतकी काही अवघड नव्हती. पहिले थोडा चढ आणि मग थोडा उतार आणि नन्तर भरपूर असा खडकाळ भाग. कड्याकडे जायची जास्तीत जास्त वाट हि वळणा वळणाची आणि खडकाळ भागातून जात होती. सुरुवातीला वाटलं कि कडा इथेच असेल पुढे म्हणून चालतच होतो चालतच होतो. पण काही दिसेच ना हो. मग हरी लागला माझी खेचायला.. आमल्या कुठे आहे तुझा कडा, कधीचा नुसता बोलतोय. मलाही माहित नव्हतं कि तो कुठे आहे. पण आशा होती कि इथेच कुठे तरी जवळ असेल म्हणून. असा अनुभव आम्हाला मागे पण आला होता जेव्हा आम्ही रतनगड ला चाललो होतो. तिथे गावकऱ्यांना कोणतीही जागा विचारली कि ते म्हणायचे कि हे इथेच हाकेच्या अंतरावर आहे. पण यार ती जागा यायला फार वेळ लागायचा. भरपूर वेळ असच व्हायचं. ड्रायव्हर पण वैतागायचा. मग अनुमान निघाला कि आपल्या आणि गावातल्या माणसाच्या हाकेत फारच भयंकर फरक आहे.तसंच इथे झालं, तुळशीराम आणि त्याचा भाऊ म्हणाला कि इथेच थोडं पुढे आहे कडा...पण यार जरा दूरच वाटलं..असो. तर मग भरपूर चाललो आणि हळूहळू काही लोक समोरच्या बाजूने येतांना दिसले ते पण म्हणाले कि आलंच जवळ म्हणून आणि एक सूचना पण दिली कि खाली काही दगड वगैरे फेकू नका कारण काही लोक खालून चढताहेत म्हणून. त्यांना नाही म्हणून आम्ही पुढे निघालो.

 
तिथून थोडं चालून एक मोठं वळण घेतलं डावीकडे आणि पोहोचलो कड्या जवळहवा फार जोरात होती म्हणून अगदी कड्याच्या बाजूला जाऊन उभं रहायची हिम्मत नाही झालीखाली झोपूनच कडा बघावा लागणार होतासगळे आडवे झालो आणि आता निसर्गाचा अगदी अप्रतिम नजरा आमच्या समोर होताडावी उजवी कडे बघू लागलोडाव्या आणि उजव्या बाजूला अगदी जवळ जवळ सारखे दिसणारे दोन मोठ मोठे त्रिकोणी डोंगर होतेअतिशय मोठेखालून वर पर्यंत अगदी निमुळते होत गेलेलेत्या दोघांमध्ये मोठी दरी होती.
 
कडा जरा अर्धवर्तुळाकार होता आणि याचे दोन्ही टोक ह्या दोन्ही डोंगरांकडे गेलेले होते, लांब पर्यंत.  माझ्या आज पर्यंतच्या भटकंतीत असा मोठा नजारा नव्हता हो पाहिला. म्हणजे आजू बाजूला दोन मोठे डोंगर मध्ये आम्ही आणि समोर अगदी दूर पर्यंत नदी वाहत जावी असा उतार आणि जंगल. म्हणजे एका वेळी डोळ्यांत सुद्धा मावत नव्हतं हो ते चित्र.. मान फिरवावीच लागत होती. सगळे खुश. एव्हडा वेळ हरी मला ओरडत होता पण आता शांत झाला होता. म्हणाला कि यार काय सीन आहे, तू नसतं सुचवलं तर कधी पाहायलाच नसती भेटली अशी जागा...मी मनात म्हणालो :)...असो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फार मोठी स्मायील पसरली होती आणि तसच बघत होतो ते आश्चर्य.     

पण माझ्या मनात काही तरी सलायला लागलं कि यार कोकण कडा तर असा नाग फण्यासारखा आहे, ती जागा तर दिसत नाही. आजू बाजूला बघून झाल्यावर खाली मान केली पण आमच्या खाली तर खडक दिसेना. म्हणजे तो भाग आत गेलेला होता. मग ट्यूब पेटली कि आम्ही अगदी कड्याच्या टोकावर झोपलेलो होतो. म्हणजे कडा बघायला इथून दूर जाव लागणार. ते दरीच अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवलं  आणि कड्याच्या उजव्या बाजूला जायला निघालो जिथून आम्हाला पूर्ण कोकण कडा बघायला भेटणार होता. मन अगदी प्रसन्न झालं होतं ते दृश्य पाहून. आता जस जसं आम्ही उजवी कडे जात होतो तस तसं ते नागफणी सारखं रूप उलगडायला लागलं होतं. अगदी दूर जाऊन पोहोचलो म्हणजे आता उजवी कडे असलेला डोंगर थोडाच दूर भासत होता आणि... वाह.. डावीकडे असलेला कडा पूर्ण पणे दिसायला लागला होता. परत आडवे झालो. आणि निसर्गाच्या अद्भुत चमत्काराकडे बघू लागलो


आई शप्पथ..इतका प्रचंड काळा खडक..भीती वाटावी असा...आमच्या समोर होता. ती नागफणी.. एकदम प्लेन कोरलेली म्हणजे टोका पासून तो खडक वळण घेवून थोडा आत घुसलेला आणि मग थोड्या अंतरापासून परत उतरता झाला होता. कसं काय शक्य आहे यार. एकदम अद्भुत, झक्कास असा व्युव होता तो. सगळे जाम खुश झालो होतो ते पाहून. काय बोलावं काय नाही समजतंच नव्हतं जस्ट बघत बसलो होतो.

किती वेळ हेच दृष्य बघत होतो, बराच वेळ झाला आणि मग निघालो परतीच्या वाटेवर. परत कड्या जवळून जात असतांना एक प्रयोग करून पाहिला म्हणजे रिकामी पाण्याची बाटली कड्या वरून फेकून पहिली. अहो ती रिकामी बाटली अशी आमच्या समोर हवेत तरंगायला लागली आणि काही क्षणातच आमच्या डोक्यावर १००-१५० फुट वर गेली. किती वेळ तिला तरंगत बघत होतो. थोड्यावेळाने ती खाली फार दूर जाऊन पडली. 2-3 दा असं केलं . मजा आली. यात बराच वेळ गेला. परतीचा प्रवास सुरु करणे भाग होते, पण यार ती जागा  सोडून  निघावं असं वाटतच नव्हतं पण काय करणार.. असो

तिथून थोड्या जवळ भास्करची टपरी आहे. लिंबू पाणी पिण्यासाठी थांबलो तिथे. त्याने पण बरीच माहिती दिली गडाबद्दल, आणि अश्या काही गोष्टी सांगितल्या ज्या सहसा कुणाला माहित नसतील. हा भास्कर पावसाळ्यात क्यांप पण लावतो तिथे. त्याचा निरोप घेतला आणि निघालो. हॉटेल  वर पोहोचलोआमचं सामान छान पैकी झाकून ठेवलं होत त्यांनी. त्यांचे आभार मानले, सामान उचललं आणि निघालो. खाली पोहोचता पोहोचता रस्ता चुकलो म्हणून थोडा टायीम पास झाला. उतरता उतरता संध्याकाळ झाली. खाली पोहोचलो, फ्रेश झालो, मस्त चहा पिला गाड्या काढल्या आणि निघालो. समोर सूर्य सह्याद्री पार जात होता. आजच्या सूर्योदय आणि सूर्यास्त मधल्या वेळात फार आठवणी साचल्या होत्या ज्या आयुष्यभर टिकणार होत्या

मित्रांनो आम्ही तर परत जाणारच आहोत हरिश्चंद्र गडावर, तुम्हाला पण जर कधी चान्स भेटला तर नक्कीच जाऊन या.