Saturday, February 11, 2012

"सुरुवात आपल्यापासूनच..."


मागच्या आठवड्यात कोर्टात गेलो होतो. जरा प्रतिज्ञापत्रक  (ऐफीडीवेट हो ) बनवायचे होते. त्या साठी जे विशिष्ट पेपर लागतात ते घेण्यासाठी लायनीत उभा राहिलो. त्या खिडकीच्या वर काही सूचना लिहिलेल्या होत्या कि वकिलांना प्रथम प्राधान्य, सही केल्या शिवाय पेपर नेऊ नये वगैरे वगैरे. लायीन फार मोठी होती आणि त्यातल्या त्यात मधेच ते वकील लोक लायीनीत न लागता तो पेपर घेऊन जायचे  (प्राधान्य ना...!!! ) यामुळे आणखीनच वेळ लागत होता. १ तास होऊन गेला तरी मी दूरच होतो त्या खिडकी पासून.

दोन तरुण मुलं त्या खिडकी जवळ घुटमळायला लागले (लायीन सोडून). अगदी त्या खिडकी जवळ जाऊन उभे राहिले. सगळ्यांना कळलं होतं कि त्यांची काय गडबड आहे ती. पण सुरुवातीला कोणी काहीही बोललं नाही. काही व्यक्ती अगदी निर्लज्ज असतात त्यातलेच ते दोघेही होते. त्यांच्या पेक्षा फार वयस्कर लोकं फार वेळे पासून लायनीत उभे होते तरीही ते तिथून हलत नव्हते. शेवटी मला बोलावं लागलं कि लायनीत या म्हणून, पण त्यांना जसं काय ऐकूच गेलं नाही (अश्या वेळी तर नक्कीच ऐकू जात नाही काहींना) ते तिथेच उभे राहिले. पुढे उभे असलेले लोक पण काही बोलत नव्हते त्यांना, कारण जरा गुंडा छापच वाटत होते ते दोघं. 
      
माझ्या पुढे एक वयस्कर मावशीबाई उभी होती आणि माझ्या मागे एक माणूस उभा होता, अगदी ६ फुट उंच, रंगाने काळा सावळा, जरा बऱ्यापैकी मिश्या असलेला, तब्बेत पण चांगली होती त्याची आणि निळा सफारी घातला होता त्याने. तो मला घडी घडी पुढे सरका पुढे सरका अस सांगत होता. किती पुढे सरकणार हो. पुढे लेडीज आहे याला कळत नाही का ते?  इतका संताप होत होता ना माझा कि काय सांगू , च्या मायला.... जे लोक पुढे असे लायीन सोडून घुसत होते त्यांना तर हा बहाद्दर एक शब्द पण बोलत नव्हता, आणि माझ्या पुढे थोडी जरी जागा रिकामी दिसली तर ह्याला भयंकर असह्य वाटत होतं. वा रे वा..सहीच आहे. शेवटी मला त्याला ओरडून सांगावच लागलं कि पुढे ते दोघ घुसलेत त्यांना तर तुम्ही काही बोलत नाही आहात आणि इथे इतक्याश्या रिकाम्या जागेचा काय प्रोब्लेम होतोय तुम्हाला. मग काही बोलला नाही तो, पण तो परत त्या थोड्याश्या असलेल्या रिकाम्या जागे कडेच बघत होता.

त्यातच एक मुलगा (त्या दोघांव्यतिरिक्त तिसरा) एका कोपऱ्यातून पुढे सरकू लागला, आणि खिडकी च्या थोडा जवळ पोहोचला. त्याने खिश्यातून पैसे काढले. लोकांची कुज बूज झाली सुरु पण बोलायला कोणी तयार नव्हतं. मी म्हणालो, ओ साहेब लायनीत या म्हणून. त्याने माझ्या कडे तिरप्या डोळ्यांनी बघितलं, परत खाली बघून काही पैसे हातात ठेऊन बाकी खिश्यात ठेवले आणि खिडकी पुढे हात करू लागला. मग आता लोक लागले ओरडायला, लायीनीत ये म्हणून. पहिले मी एकटाच बोललो म्हणून त्याने काही लक्ष नव्हतं दिलं पण आता सगळे आपल्या कडेच बघत आहेत म्हणून तो बोलला कि वकिलांच काम आहे म्हणून. सगळे लोक एकाच वेळी ओरडले मग कि आमचं काय घरच काम आहे का मग? लायीनीत ये... आणि गोंधळ वाढला. मग तो चुपचाप निघाला आणि मुद्दामून माझ्या जवळ येऊन म्हणाला कि बघ तुझ्या समोरच घेतो (च्या मायला...!!!) म्हणालो या तुम्ही आता आणि तो दुसऱ्या लायीनीत जाऊन तोंड लपवून उभा राहिला. बरोबर आहे इतके लोक ओरडले तर तोंड दाखवायला जागा कुठे राहते म्हणा.

परत एक तब्बेतशीर व्यक्ती तश्याच प्रकारे तो पेपर घेऊ लागला...लायनीत न लागता. परत गोंधळ झाला पण बिचाऱ्याने अगदी नम्रपणे सांगितलं कि तो रिटायर्ड न्यायाधीश आहे म्हणून आणि आयकार्ड दाखवायला लागला. आयकार्ड वगैरे बघण्याच्या भानगडित कोणी सहसा पडतं नाही. सगळे शांत झाले. त्याने नम्रपणे सांगितलं म्हणून पटून गेलं.

आता साध्या गणवेशातले वकील/न्यायाधीश कसे ओळखता येतील बर? असा सवाल सगळ्यांना पडला होता ...अशक्य आहे हो ते. पण मग करायचं तरी काय? भरपूर काळ्या कोट वाले वकील तिथे येऊन काम करून जात होते. पण मग मधेच कुणी साध्या गणवेशातला येऊन जायचं. आता ओरडणं भागच आहे कारण चांगलंच उन लागत होतं वरून. लोकं अगदी त्रस्त झाले होते आणि त्यातल्या त्यात पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई आली आणि डायरेक्ट खिडकी जवळ गेली. आता लेडीज ला काय बोलणार? पण मग लायनीत असलेली मावशीच जोरात ओरडली कि " ये बये लायनीत ये" म्हणून. या वाक्यावर त्या दुसऱ्या बायीने अगदीच वैताकलेला लूक दिला हो. आता परत दुसरेपण लोकं ओरडले तर ती त्यांच्यावरच ओरडून म्हणाली कि वरती बघा काय लिहिलं आहे ते. आता काय बोलावं यावर?  जर का तिला असा सांगायचं होतं कि ती वकील आहे तर सरळ सरळ सांगायला काय होतं? असे लूक द्यायची काय गरज आहे. वकिलाचा ड्रेस घालून आली असती तर कोण बोललं असतं हिला ? हे वकील लोक आपल्या कडे अश्या नजरेने बघतात जसं ते सोडले तर सगळं जग गुन्हेगारच आहे. काय काय लोकं पाहायला भेटत होते तिथे काय सांगू तुम्हाला.                        

परत त्या दोन मुलांच्या हालचाली वाढल्या. आता लायनितला एक म्हातारा जोरात ओरडला कि आमच्या पेक्षा जास्त वय झाला का रे तुमचं. मग ते दोन मुल हा म्हातारा जरा जास्त ओरडला म्हणून तिथून लांब झाले. पण त्यातला एक त्या म्हाताऱ्याच्या जवळ येऊन बोलला कि ओरडू नकोस मरून जाशिल. खरच त्या वेळी एक जोरदार काना खाली द्यावीशी वाटली त्याच्या, पण त्या म्हाताऱ्याने ते मजाकवारी  घेतल म्हणून बर झालं. पण विचित्रपणाची हायीट तर पुढे झाली हो, म्हणजे त्यातला एक मुलगा(जो म्हाताऱ्याला बोलून गेला तो) तो एका माझ्या दोन नंबर पुढे असलेल्या मुलाला म्हणाला कि यार एकंच पेपर घ्यायचा आहे. आता इतका वेळ ज्याने त्यांची हि सगळी गम्मत बघितली तो नक्कीच नाही म्हणाला असता...पण ह्या नालायकाने त्याला जागा करून दिली हो. अगदीच वायीत वाटलं मला आणि बोलल्या शिवाय रहातच आलं नाही. त्या व्यक्तीला बोललो कि तुम्हाला जर का नसेल घाई तर मला द्या तुमचा नंबर आणि या मागे माझ्या जागे वर. इतके सगळे वयस्कर लोकं लायनीत उभे आहेत आणी तुम्ही याला मधेच जागा देतात वरून? हे पटतं का तुम्हाला?... त्याची काहीच रीएक्षण नव्हती आणि माझा नुसता संताप संताप.                      

नंतर तो निळ्या सफारी वाला माणूस मला म्हणाला कि माझ्या जागे कडे लक्ष ठेवा मी जरा बघून येतो काय गोंधळ चालू आहे पुढे आणि थोड्याच वेळात तो पेपर हातात घेऊन येतांना दिसला.  "थोडं तरी पटत का तुम्हाला हे?" मी त्याला म्हणालो. चेहऱ्या वर निर्लज्जपणाच हसू आणून तो तिथून निघून गेला. हा इतका प्रकार चालू असतांना काही लोकं कुजबुजायला लागले आणि मलाच हळू सांगायला लागले अहो हे असच चालणार, कोणी सुधारणार नाही. माझा संताप तर आणखीनच वाढला. म्हणालो आपल्यालाच जर का सुधरायचं नसेल तर कळवून टाका त्या आण्णाला कि आम्हाला नको काही चांगल्या गोष्टी. नको तो लोकपाल बिकपाल. उगाच जीव काढू नका म्हणा, उपोषण बिपोषण करून काही फायदा नाही. काय बरोबर बोललो आणि काय चूक मला नाही कळलं पण काय करू यार फारच संताप झाला होता.

मला तर समजतंच नव्हतं कि काही लोकांना कसं कळत नाही कि त्यांच्या वर अन्याय होतो आहे? आणि काही तर दुसऱ्याच्या वायीट कृतीला साथ देऊन स्वतः वर अन्याय करून घेतात आणि भरपूर लोक ह्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तयारच असतात. स्वतःचा फायदा आला तर लोक जगाला लगेचच विसरून जातात. माझा काम झालं... बस... बाकी मला काही घेणं देणं नाही. अरे यार... असं कसं चालेल? इथूनच तर खरी भ्रष्टाचाराची सुरुवात होते. जीथे फक्त स्वतःचा विचार येतो..स्वतःचाच फायदा दिसतो तिथेच तर माणूस भ्रष्ट आचार करतो. 

वरच्या गोष्टीत काही लोकं तर काहीच बोलत नव्हते, फक्त गम्मत बघत होते. इथे जोरात बोलणं सुद्धा त्यांना अवघड जात होतं. मग खरच एखाद्या मोठ्या प्रसंगी काय करतील हे लोकं? काही बोलतील कि फक्त जे चालू आहे ते सहनच करत राहतील?  तिथे मी जे काही बोललो त्यामुळे मला जरा मोकळं फिल व्हायला लागलं होतं कारण तुमच्या वर जर का काही अन्याय होतं असेल आणि तो तुम्हाला कळत नसेल तर काहीच प्रोब्लेम नाही पण जर का तो कळत असेल आणि आपण काहीच बोलत नसू तर मनातल्या मनात फार घुसमट होते, फार त्रास होतो मनाला. ह्या वेळी मी वाचलो ह्या त्रासापासून. असं काही छोटंसं जरी काम केल तर मनाचा खंबीरपणा थोडातरी वाढतो.  मग आण्णाचा विचार आला कि हा एकटा माणूस पूर्ण सिस्टीम विरुद्ध उभा राहिला आहे. किती गट्स असतील यार या माणसात.... आण्णा कडे पाहून कळूनच जातं कि त्यांच मन किती खंबीर आहे ते. आता फक्त एव्हडच सांगतो कि सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे.  तुमचाही असा काही अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा...!!!                  

Saturday, February 4, 2012

" दोष कुणाचा ?"

" परत पोहोचलो मी त्याच जागी..
ठरवले होते कि फिरकायचे ईकडे कधीच नाही...
तरही प्रश्न होता माझा माझ्या मनासाठी...
कि कारे मना तू माझे का ऐकत नाही?"
" मन म्हणाले "मी नाही...! तुला तर आणले  ह्या पाऊलांनी.."
"मी नको नको म्हणता ते इकडेच का वळतात?"
मन लागले माझी समजूत काढू...  
काय माहित मनाच्या मनात काय होते सुरु...?"
" पाउलांनी देखील दिले हात वर करून...
"आम्ही तर नाही बुआ....!"
" हे डोळे बघत असतात इकडेच कायम ..."   
हाच मार्ग दिसतो त्यांना...म्हणून आमचा पण राहत नाही  संयम "
" पण डोळे तर काही बोलतच नव्हते...
कारण  पापण्यांतील अश्रू सांभाळणे त्यांना  कठीण जात होते...
त्यांना होत होता खूपच त्रास...
कारण हव्याश्या प्रेमळ भूतकाळाचा होत होता आभास.."
" आता  मला इथे आणण्याचा  दोष तरी कुणाचा 
मनाचा, पाउलांचा कि ह्या डोळ्यांचा...?
नेहमी प्रमाणे ठेवला आरोप मी त्या भूतकाळावरच... 
आणि निघालो त्याच पाउल वाटे परत..."