Tuesday, March 8, 2011

" माझी भ्रमंती - तळेगाव ते रोहा "


कधी पासून ठरवलं होतं कि रोह्याला जाऊ जाऊ, पण पक्का असा प्लान्निंग होतंच नव्हता हो. पण त्या दिवशी ठरवलंच कि सकाळी निघायचंच म्हणून निघायचंच. यासाठी रात्रीच गाडीची टाकी फुल करून आणली. हे मी मुद्दामून केलं कारण जो पर्यंत आपण काही पाऊल टाकत नाही न जे करायचा आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये तो पर्यंत एनर्जी येतंच नाही. गाडीत पेट्रोल भरलं म्हणून मनात जरा वातावरण निर्माण झालं आणि आता मी निघणारच असं पण नक्की झालं.

त्या दिवशी शनिवार होता आणि सुट्टी होती. भावाच्या मुलीना पण सुट्टी होती. वहिनीला वाटलं कि, चला किती तरी दिवसांनी सकाळी चांगली झोप होयील म्हणून. पण मग मी आदल्या दिवशी वहिनीला माझा प्लान सांगितला. घेतला त्यांनी डोक्याला हात मारून आणि काय. पण मग मी मुद्दामून म्हणालो कि असुद्या म्हणून, मी जायिन माझा माझा निघून. त्यावर वहिनी म्हणाल्या, असं का, बर..जा हं ! वहिनीला देखील माहित होत कि त्या मला नाश्ता पाणी दिल्या शिवाय अस काही निघू देणार नाही.

सकाळ झाली.. माझ्या पहिले वाहिनी उठल्या आणि मस्त चहा आणि नुडल्स बनवून दिल्या.  वाह..अंघोळ झाली नाश्ता झाला मग मस्त थंड अश्या हवेत माझी अवेंजर काढली आणि  मी निघालो रोह्याच्या दिशेने. रस्ता माहित नव्हता म्हणून आदल्याच दिवशी गुगल वर रस्ता शोधून ठेवला होता आणि  मोबायिल मध्ये फोटो पण काढून घेतले होते. तर मग माझा रूट होता तळेगाव- लोणावळा- खंडाळा- पाली- रोहा असा.

थंड हवेत गाडी चालवण्याची मजाच काही और आहे ते पण रस्ता मुंबई पुणे हायवे सारखा असला तर मग काय विचारनंच नको. कधी लोणावळ्याला पोहोचलो समजलंच नाही.  फार छान सीन्स पाहायला भेटले, खास करून लोणावळ्याच्या घाटात. इथे थांबण्याचा मोह मी आवरला कारण फार लांब जायचा होतं आणि संध्याकाळी परत पण पोहोचायचं होतं. पुढे खंडाळा घाट उतरताना अगदी मजा येते. म्हणजे तुम्ही गाडी न्युट्रल जरी केली तरी ६०-७० चा स्पीड घेते ती. आणखीही तो वाढू शकतो..पण मग तुम्ही गेलाच म्हणून समजा कारण इतके वळण घ्यावे लागते कि  गाडीचा स्पीड तुम्हाला कंट्रोल करावाच लागतो.

एकापेक्षा एक मस्त असे दृश्य होते तिथे. दुसरा सीन पाहतांना पहिला त्याच्या समोत फिका वाटायचा.  अश्याच लाजवाब दृष्यांपैकी एक म्हणजे खंडाला घाटातून सकाळी सकाळी खाली असलेले खोपोली गाव बघणे. मी आज पर्यंत फक्त चित्रच पाहिलं होतं असं, असं दृश्य त्या दिवशी पाहायला मिळाले. म्हणजे खाली छोटी छोटी घरे पुसट अशी दिसत होती. एखाद्या धुक्याच्या गुछ्यातून मधेच एकाध घर डोकवायचं आणि जिथे जिथे धुक विरळ होतं तिथे तिथे ती थोड स्पष्ट दिसत. म्हणजे धुक्याने गावाला मस्त मिठी मारली होती, आणि  गावानेपण निश्चिंत होऊन त्याची मान टाकून दिली होती. काही ठिकाणी उंच झाडांचे फक्त शेंडेच दिसत होते कारण त्यांच्या खालचा भाग धुक्याने झाकून टाकला होता. तुम्ही मनात जरी विचार केला तरी छान वाटेल तुम्हाला. सगळी कडे तो धूसर रंग पसरलेला होता आणि मधेच एकाध घर किवा झाड त्याच अस्तित्व दाखवायचं. चारही बाजूने मोठ मोठे डोंगर होते आणि मध्ये हे धूसर जग. खोपोलीचे लोकं स्वप्नात कोणत्या तरी रम्य नगरीत फिरत असतीलच. आता मी जिथे उभा होतो तिथून त्यांनी जर का बघितलं तर ती नगरी त्यांचच गाव आहे, असा नक्कीच विश्वास पटेल त्यांचा. छान वाटलं हे बघून आणि मग मनात हे दृश्य साठवून मी पुढे निघालो.

 खोपोली चौफुलीहून लेफ्ट टर्न घेतला कि मग ३-४ किमी नंतर ब्रिज उतरून लगेचच परत लेफ्ट टर्न घ्यायचा. मग हा रस्ता म्हणजे खोपोली-पाली रस्ता. जवळ जवळ ३५ किमी लांब आहे हा. मस्त निसर्ग सौंदर्याने भरलेला. रस्ता चांगल्या अवस्थेत आहे म्हणून गाडी चांगली पळवता येते. दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी आणि मधून तुम्ही त्यांच्या सावलीतून पुढे सरकत असतात


अगदी अप्रतिम असं दृश्य होतं ते आणि अश्या वातावरणात शांत /रोम्यांटिक गाणे ऐकत बाईक चालवण्यापेक्षा आनंदाची राईड  कुठली असू शकतेखूप वेळ ह्या अश्या वातावरणातून जात असतांना तुम्हाला एक वेगळीच फिलिंग येते, म्हणजे तुम्ही पण  याचाच काही भाग आहात असं वाटायला लागतं. एकदम मुक्त अश्या पक्ष्याप्रमाणे. मग पाली पर्यंत पोहोचता पोहोचता खूप छोट्या वाड्या/गावे ओलांडावी लागतात. पण रस्ता छान आहे. मग येतांना नक्कीच बल्लाळेश्वराला नमस्कार करण्याचं ठरवलं. पाली वरून जस्ट १-२ किमी अंतरावरून उजवीकडे  'उन्हेरे' गावाचा बोर्ड लागतो मग तिथून उजव्या बाजूला वळायच आणि परत १-२ किमी गेल्या वर हा बोर्ड दिसतो.


निसर्गाच्या काही चमत्कारांपैकी एक चमत्कार तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तो चमत्कार म्हणजेगरम पाण्याचे झरे”, जे पृथ्वी वर अगदी तुरळक जागेवरच आहेत. काही महिन्यांपूर्वी समीर पाध्ये ह्या विद्यार्थ्याने जेव्हा इथल्या पाण्याची प्रयोग शाळेत टेस्टिंग केली तर त्याला 'क्लेडोसेरा' नामक जीवाणू/विषाणूच्या 2 नवीन स्पेसीज सापडल्या. ह्या जातीतल्या जास्तीत जास्त स्पेसीज ह्या ताज्या पाण्यातच आढळतात (त्या पाण्याकडे पाहून वाटत तर नव्हतं कि हे ताजं पाणी असेल..असो) पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे अश्या पाण्यात सल्फर फार जास्त प्रमाणात असतं, जे कोणत्याही प्रकारच्या आजारावर चांगले मानले गेले आहे (इथे मला काही सांगावसं वाटतं कि, मी घरी अंघोळ करून आलेलो होतो आणि मला कुठल्याही प्रकारचा आजार पण नाहीम्हणजे आपला सहजच सांगितलं)

फार दिवसांनी असं काही वेगळं पाहिलं. वेगळं म्हणजे अगदीच नवीन गोष्ट होती हि माझ्यासाठी. त्यामुळे अत्यानंद झाला होताआपल्या इतक्या जवळ असा काही निसर्गाचं चमत्कारिक रूप असेल असं कधी वाटलंच नाही.


 तर ह्या जागी 2 गरम पाण्याचे कुंड आहेत. 1 हे वर दाखवल्याप्रमाणे ओपन आहे आणि दुसरं मस्त बंदिस्त आहे. आता इतका मोठा आलेला चान्स कसा सोडणार मी. त्यातल्या त्यात सकाळचे आठ साडे आठच वाजले होते म्हणून वातावरणात गारवा तर होताच आणि थंड हवेत गाडी चालवून थोडी हूड हुडी पण भरली होती (काही तरी कारण शोधत होतो मनाला समजवण्यासाठी.. :)) मग काय मस्त पाण्यात उतरलो. पहिला पाय टाकताच थोडा चटकाच लागला हो. अंघोळीच पाणी जितकं गरम असतं तितकंच गरम होतं ते. छान पैकी पडून राहिलो. फार मोठा आलिशान असा बाथ टब वाटत होतं तो. काही वेगळाच आराम वाटला, अगदी अप्रतिम. कधी चान्स भेटला तर नक्की जाऊन या तुम्ही पण, तुम्हाला पण छान वाटेल, अस १००% खात्रीने सांगतो


गावकऱ्यांना विचारले असता ते म्हणाले कि रात्री जास्त गरम होतं हे पाणी म्हणून आणखी जास्तच नवल वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ओपन अस कुंड आहे ना त्यावर लवकरच सिमेंटच छत टाकणार आहेत..चला चांगलंच आहे मग.  कधीही विसरणार नाही असा हा अनुभव होता. विसरणार तर नाहीच नाही पण परत नक्कीच येणार. हा सगळा अनुभव मनात साठवत गाडी काढली आणि पुढच्या प्रवासाला लागलोरोह्या कडे निघालो.

क्रमशः.......

1 comment:

  1. Agadi mast lihile ahes re….

    Tuza sagla prawas dolyasamor ubha rahila J

    ReplyDelete