Monday, February 7, 2011

" अविस्मरणीय...अविश्वसनीय असा अनुभव "त्या दिवशी विजयच्या घरी बसलो होतो. असंच गप्पा मारत टायीम पास चालु होता. माउशी, माई (विजयची बहिण) आणि वहिनी पण होत्या. त्यांच्या शेजारच्या घरी उद्या लग्न होतं म्हणून आज पूजा वगैरे गोंधळ चालू होता.  मायिने आम्हाला बाहेर बोलवलं, मागच्या बाजूला, जिथे पूजा चालू होती तिथे, गम्मत बघण्यासाठी. लगीन घराबाहेर बरीच गर्दी जमली होती.

तिथे एक माणूस डोक्यावर एक कापड, त्याच्यावर एक ग्लास उलटा करून आणि त्याच्या वर पाण्याने भरलेली कळशी ठेऊन नाचत होता. बारीकसाच होता तो, त्याच्या कपाळावर मोठा टिळा होता, गावाकडचा गडी वाटत होता तो. फार अवघड आहे असं नाचणं, पण तो तर आरामशीर नाचत होता. 5-10 मिनिट असंच चालू होतं. मी जोक्स मारत होतो, मजा घेत होतो. माई ओरडली कि मजाक नको करू म्हणून. मग थोडा शांत झालो आणि ते बघू लागलो. खूप गर्दी झाली होती. असं वाटत होतं कि लोक  कसली तरी वाट पाहत आहे म्हणून.

खूप नाचून झाल्यावर त्याच्या डोक्या वरून ती कळशी पडली. तो थांबला, त्याने ती कळशी परत डोक्यावर ठेवली आणि नाचू लागला, मदहोश होवून. काही वेळाने परत कळशी पडली, परत डोक्यावर ठेवली आणि तो नाचू लागला. तिसऱ्यांदा परत असं झालं, पण ह्या वेळी तो थांबला नाही. कळशी पडली पण त्याचं नाचणं चालूच राहिलं. त्याचे डोळे बंद झालेले होते, त्याला कळतच नव्हतं कि तो कुठे चालला आहे ते, त्याच्या मागे एक माणूस उभा राहून त्याला सहारा द्यायला लागला, आणि तो नाचतच राहिला, नाचतच राहिला अंगात काही तरी आल्या सारखं.

त्याच्या आजूबाजूच्या लोकांना काहीच विशेष वाटत नव्हतं, मला वाटलं कि ते ह्याच क्षणाची वाट पाहत होते म्हणून. चिल्लर पार्टी कुजबुज करू लागली. तो आता जोर जोरात मान फिरवायला लागला होता. ज्याचं लग्न होतं, तो समोर एका खुर्ची वर बसलेला होता आणि वरमाय त्याच्या शेजारी हातात कुंकवाचा करंडा घेऊन उभी होती. आता ह्याच्या तोंडून घुमतांना जसे आवाज येतात तसे आवाज यायला लागले होते.

त्या नवऱ्या मुलाच्या आईने मग आता ज्याच्या अंगात आले होते त्याच्या कपाळाला कुंकू लावला. हा घुमत हळू हळू खाली बसू लागला. गुढग्यांवर बसला, आणि गोल घुमू लागला. मी पहिले असा प्रकार पहिला नव्हता, म्हणून जरा जवळ जावून पाहू लागलो. तो घुमतच राहिला आणि अचानक जोरात ओरडायला कि ‘अंबा माता कि जय’ आणि मग त्याच्या मागे सगळे जन ओरडले.
तो पुढे बोलू लागला, अगदी बायीच्या आवाजात. मग तिथे एक मुलगी आली, बहुतेक ती नवरदेवाची बहिण असावी. ती डायरेक्ट त्याच्याशी बोलू लागली. ती म्हणाली कि ‘आई..घरी जोगवा आलाय त्याचा काय करू…दुसऱ्या देवी कडे घेऊन जायचा आहे’. ह्याचं घुमण चालूच होतं. घुमता घुमता हा बोलला ‘तू तर माझीच मुलगी आहे ग..तुला कोणी सांगितलं हे..?’
‘मागे एक बाबा आले होते घरी त्यांनी”
तो घुमत बोलला.. ‘अगं कोणत्या देवी कडे नेणार ग तू..?..ती चांदवडची रेणुका.. मीच ग…ती तुळजापूरची भवानी… मीच ग…ती कोल्हापूरची अंबाबाई… मीच ग’
मी डोळे फाडून हा प्रकार पाहत होतो. सगळ्यांनी देवीच्या नावाचा उधो केला. त्याने जोरात  देवीच्या नावाने आवाज दिला…आणि…हात अगदी ताट करत.. आकाशाकडे मान करत त्याने त्याची पूर्ण जीभ जीतकी बाहेर काढता येयील तितकी काढली…महाकाली सारखी. त्याचं हे रूप पाहून तर माझ्या अंगावर काटेच आले. मी बघतच राहिलो, कळतच नव्हतं कि पुढे काय होणार. विजय हळूच माझ्या कानात बोलला, कापूर लावल्याशिवाय देवी जाणार नाही. खरच.. लगेच त्या काकू त्याच्या जवळ आल्या, हा अजून त्याच भयानक अवस्थेत होता. त्याच्या पूर्ण बाहेर आलेल्या जिभेवर त्यांनी कापूर ठेवला आणि तो पेटवून दिला. तो कापूर जळतच होता..जळतच होता, 20-25 सेकंद. साधारण माणूस असं अजिबात करू शकत नाही..अजिबात नाही.  कापूर विझला मग तो हळू हळू त्याचा डोकं जमिनीकडे नेवू लागला...म्हणजे ते आपोआप होत आहे असंच वाटत होतं..हात तसेच ताट होते…डोळे मिटलेले. देवीचा उदो उदो झाला. त्याने डोकं खाली ठेवताच त्याचे हात इतक्या झटकन खाली गेले कि काय सांगू. जसं काय एखादी गोष्ट अचानक तुटून पडावी अगदी तसंच. बापरे..! माझ्या डोळ्यांवर तर माझा विश्वासच नव्हता बसत. परत सगळे देवीचा उदो उदो करायला लागले. 

थोडी शांतता पसरली. परत 1-2 मिनिटांनी तो उठला, म्हणजे तसंच गुढग्यांवर बसूनच ओरडला.. "बोल भवानी माता कि जय”. परत तसंच, म्हणजे कोणी काही प्रश्न विचारले. त्याने म्हणजे त्याच्यात  आलेल्या देवीने उत्तरे दिली. ह्या वेळी परत त्याच्या मुखातून निघालेल्या एका वाक्याने माझ्या अंगावर शहरे आणले, ते असं होतं कि, “तो खंड्या, तो तर माझा भाऊच आहे ग..”. खंड्या..मला कळून चुकलं होतं कि तो आपल्या जेजुरीच्या खंडेराव महाराजांबद्दल बोलत होता. ज्या माणसाचं डोकं ठीकाण्यावर आहे, तो तर असं कधीच बोलू नाही शकणार..चुकून सुद्धा नाही. पण याच्या अंगात तर वेगळीच शक्ती दिसत होती...जिच्यात हिम्मत होती असं बोलायची.  
   
सगळं बोलून झालं, मग परत त्याचा तोच अवतार. हात अगदी ताट, डोळे मिटलेले, मान आकाशाकडे आणि संपूर्ण जीभ..जितकी बाहेर काढता येयील तितकी बाहेर काढलेली. परत त्या काकू आल्या, परत कापूर ठेवला आणि पेटवला. ह्या वेळी कापूर थोडा जास्त वेळ जळत होता. लोक ओरडायला लागलेत “अरे काळ्या कपड्यावाले बाजूला व्हा रे..देवीला चालत नाही ना”. मग लगेचच काळ्या कपड्या वाल्यांना मागे ढकलण्यात आलं . ते पण पटकन घाबरून मागे झाले. विजय पण रस्त्यात उभा होता, लकीली काळा शर्ट घालून. लोक त्याच्यावर ओरडले. त्याची आई तर त्याला म्हणाली, कि तू शर्टच बदलून ये म्हणून. मग तो कापूर विझल्या वर परत त्या व्यक्तीच्या आत असलेली शक्ती अचानक पने निघून गेली. त्या जमा झालेल्या गर्दीत एक दारुडा पण होता. टाकून आला होता तो. हे दृश्य पाहून तो जरा भावूक झाला. घडी घडी तो देवीचा उदो उदो करायला लागला. सुरुवातीला लोकांनी साथ दिली त्याची, पण नंतर थोडं जास्तच झालं म्हणून लोकांनी त्याला शांत बसायला लावलं.        

आता तिसरी वेळ..मला तर कळतंच नव्हतं कि याच्यात किती सहन शक्ती आहे आणि ती किती वेळ राहणार. पण ह्या वेळी सर्वात अविश्वसनीय अशी गोष्ट घडली. जेव्हा आता तिसऱ्यांदा त्याने देवीचा जयकार केला, त्या नंतर लगेचच तो पटापट कन्नडी कि कोणत्या तरी भाषेत बोलायला लागला हो. मला तर काही सुचेनासं झालं. वाटलं हा गावाकडचा गडी दिसतो, ज्याला मराठी सोडून हिंदी सुद्धा व्यवस्थित नाही बोलता येणार मग इतक्या पटापट हि कोणती भाषा बोलतोय हा?...काय बोलणार…शब्द नाहीत विश्लेषण करायला माझ्याकडे. मग मधेच कोणी तरी बोललं, “आई हि भाषा नाही कळत ग, आमच्या कडची नाही, समजेल अश्या भाषेत बोला न”. यावर तो काही नाही बोलला. लगेचच परत त्या त्याच्या जाण्याच्या अवस्थेत गेला. कापूर जाळण्यात आलं..काही क्षणात ती ज्वाला विझली..आणि झटक्यात ती शक्ती गेली. होती का नव्हती झाली.  

हा परत डोकं वर करायला लागला. सगळे अगदी शांत होवून बघत होते. याने डोकं वर केलं, आणि उभा राहिला हो..हाताकडे बघून इकडे तिकडे बघायला लागला आणि विचारू लागला “अरे माझं घड्याळ कुठे पडलं रे…?” त्याचा परत पूर्वी सारखा झाला होता. लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. तो आता नॉर्मल माणसासारखा वागायला लागला, जसं का काही घडलंच नाही त्याच्या बरोबर.
परत देवीचा जय जयकार झाला.

सगळे खुश होते कि देवी भेटून गेली म्हणून. स्वाती वहिनीचा चेहरा थोडा पडलेला दिसला कारण त्या थोड्या घाबरून गेल्या होत्या, त्यांना भीतीच वाटते अश्या गोष्टींची. लगेच आम्ही परत घरात गेलो. तिथे जे काही घडलं होतं, मागच्या 15-20 मिनिटात ते सगळं फार अविश्वसनीय होतं. अश्या गोष्टी न मानणारयासाठी ते एक टायीम पास…नाटक असं काही तरी होतं. पण जो मानत असेल त्याच्या अंगावर काटे नक्कीच आले असतील.