Wednesday, January 26, 2011

" ओ आज मौsssसम...."

आज फार उशीर झाला होता ऑफिसला जायला, काय करणार हो झोपच आवरत नव्हती. उठलो मग झाली पळा पळ सुरु. वहिनीने नाश्ता करून ठेवला होता, तो खाण्यासाठी पण वेळ नव्हता. वहिनीला म्हणालो कि, एखाद्या टिफिन बॉक्स मध्ये टाकून द्या, ऑफिस मद्धे खायीन आरामशीर. असच असतं, साली झोप कधी कधी काहीच सुचू देत नाही. तिचा आस्वाद घेतांना तर मजा वाटते. पण ती गेल्या वर भलतंच टेन्शन येतं कि कशाला आली होती म्हणून. 

त्या दिवशी माझं असच झालं. घाई घायीत आवरलं सगळं आणि सुसाट निघालो. फक्त हायवे वरूनच प्रवास करायचा होता, मग काय... म्हणालो पळवा नुसती गाडी. माझी गाडी चांगली २२० सीसी ची आहे, नुसता कान पिळत होतो तिचा. तळेगावचं वातावरण कायम छान असतं, आणि त्यातल्या त्यात थंडीचे दिवस. पण आज काही वेळ नव्हता त्या वातावरणाचा आनंद घ्यायला. जर का मनात काही टेन्शन असलं तर सभोवतालच वातावरण कितीही लुभावणं असलं तरी मन लागत नाही. कुठे बघण्याचा वेळ पण नव्हता. लगेचच हायवेवर लागलो. हायवे वर गाडी चालवण्याचे कौशल्य पणाला लागले होते. इकून टिकून कशीपण गाडी टाकत होतो. गाड्यांच्या मधून..डावीकडून..उजवीकडून..जिथून थोडी जागा दिसली तिकडून काढत पुढे निघत होतो. जोरात गाडी चालवतांना काही क्षणातच खूप गोष्टी मनात चमकून जातात. म्हणजे गाडी टाकू कि नको टाकू...याचा स्पीड किती..त्याचा किती...गाडी निघेल कि नाही...थोडा चान्स दिसतोय टाका आता...त्याने इंडिकेटर दिलंय..हा वळतोय....आणि खूप काही.           

हिंजेवाडीत आलो, पहिले इथे थोडा रस्ता खराब होता, पण नुकतंच भरपूर खड्डे भरण्यात आले होते. मग काय गावातून पण पळवली जोरात. मेन रोड वर आलो. हिंजेवाडीच्या पेट्रोल पंपासमोर सकाळी सकाळी फार जास्त ट्राफिक असतं, आणि जेव्हा घाई असते तेव्हा तर नक्कीच ट्राफिक लागतं. मग नुसती तडफड होते हो, पिंजरयातल्या पाखरा सारखी, जिथे थोडी जागा दिसली तिथे मान टाकून पहायची. बाहेर निघता आलं तर चांगलंच आहे नाही तर दुसरी कडे जागा शोधायची. माझाही तसंच झालं थोडी रिकामी जागा दिसली तर लगेच तिथे गाडी टाकायचो. हेच चालू  होतं ५-६ मिनिटं. असाच जोरात चाललो होतो अचानक पुढे एक सुमो आली, उजवी कडून घेणार तेव्हढ्यात इकडे पण एक फोर व्हीलर आली. घ्या...नुसता अडकून पडलो. सुमोच्या डाव्या बाजून जाऊ म्हटलं तर इतकी जागाच नव्हती ठेवली त्याने. मग त्यांच्याच स्पीड ने हळू हळू चालत होतो आणि मनात नुसता जळत होतो, तडफडत होतो. वाटत होतं कि आताच यांच्या डोक्या वरून गाडी टाकावी...पण..असो.     

गाडी कधीची पाचव्या गियर वरून दुसऱ्या वर आली होती, काहीच करू नव्हतो शकत. याच स्पीडने एका गल्ली समोरून गेलो. असाच मनात ह्या मोठ्या गाडीवाल्यांना शिव्या देत होतो, नुसता संताप करत होतो आणि अचानक माझ्या कानावर काही शब्द ऐकू आले, "ओ आज मौSSSSSसम..बडा बेयीमान है..बडा बेयीमान हे....." च्यायला… मी डावीकडे बघितलं... एक सायकलवाला, कधी आला तो माहित नाही, मस्त त्याच्याच धुंदीत गात चालला होता. मस्त खांदे डावी उजवी कडे वळवत आणि सायकलचे पेंडेल मारत, जोर  जोरात गाणं म्हणत चालला होता. मी २-३ सेकंद त्याच्याच कडे बघत होतो. त्याचं गाणं ऐकून माझी तर हवाच निघून गेली. तो सकाळच्या गारव्याचा पूर्णपणे आनंद घेत होता. मनात विचार आला कि, मी इतका टेन्शन मध्ये आणि हा इतका आनंदात कसा काय चालला..? हा दिवसाचे जास्तीत जास्त २००-३०० रुपये कमवत असेल. आज काम नाही केलं तर रात्री जेवायला नाही भेटणार याला. तरीही हा इतका मजेत चालला आहे आणि मी... माझ्या वर तर असं कसलंच टेन्शन नाही, मग मी का इतकी घाई करतोय..?   

मनात हाच विचार घोळायला लागला आणि त्याच स्पीडने मी चाललो होतो. आता रस्ता थोडा रिकामा झाला होता, कारण माझ्या पुढच्या गाड्या चान्स मिळताच सुसाट निघून गेल्या होत्या. पण आता माझ्या कडून काही गाडीचा स्पीड वाढेना. मनात नुसतं तेच गान येत होतं, "ओ आज मौSSSसम, बडा बेयीमान हे, बडा बेयीमान हे..आज मौसम". मी जरा घड्याळा कडे बघितलं, नेहमी पेक्षा ६ मिनिट कमी लागले होते. काय मोठा तीर मारला मी ६ मिनिट वाचवून काय माहित..?

तिथून पुढे मी पण मनात तेच गाणं गुणगुणत कंपनी पर्यंत गेलो. असं मस्त वाटायला लागलं होतं कि काय सांगू. सगळं टेन्शन गायब. गाडी जोरात चालवताना जो माझा चेहरा अगदी सिरीयस होता त्याच्याच वर आता मस्त स्मायील पसरली होती. त्या एका गाण्याने फार मोठा करिष्मा केलं होता. ऑफिस मध्ये पोहोचलो. थोडं उशिराच आलो होतो पण सगळ्या गोष्टी तश्याच होत्या, कश्यात काहीच बदल नव्हता झालेला.      

खरच असच होतं खूप वेळा, कधी कधी आपण ज्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतो त्यांच्या वर थोडा विचार केला तर असं वाटत कि, यार म्याणेज झालं असतं आरामशीर. उगाच टेन्शन घेतलं. 
म्हणजे माणसाने टेन्शन जर का घेतलं तर प्रत्तेक गोष्टीचं येऊ शकतं. पण टेन्शन घेतलं म्हणजे सगळं ठीक ठाक होतच असं पण नाहीये.  म्हणून काही टेन्शन नका घेऊ माझ्यासारखं. सगळ्या गोष्टींचं आनंद घ्या आणि म्हणा.. "ओ आज मौSSSसम, बडा बेयीमान हे, बडा बेयीमान हे..आज मौसम". J

No comments:

Post a Comment