Thursday, January 13, 2011

" संक्रांत आणि पानिपत "

ऑफिस मधून घरी येत होतो, तेव्हा रस्त्यातच भावाचा फोन आला, हे सांगण्यासाठी कि एका मराठी वाहिनी वर पानिपत बद्दल माहिती दाखवत आहेत. काय हा शब्द आहे हो, 'पानिपत' ज्याला माहित त्याला ऐकू आल्या आल्या त्याच्या डोक्यात एका क्षणात नक्कीच हजार विचार चमकून जातील.  घरी पोहोचताच तो चेनेल लावला. त्यात सगळं डिटेल मद्धे सांगण्याचा प्रयत्न केला हो त्यांनी. खर तर इतका मोठा ऐतिहासिक क्षण इतक्या कमी वेळात दाखवणं जरा अवघडच काम आहे. पण तरीही खूप छान पणे मांडलं त्यांनी. 

मी विश्वास पाटील यांचं "पानिपत" वाचलं आहे, आज हा कार्यक्रम पाहून परत त्या घनघोर युद्धाचा उजाळा झाला. "सदाशिवराव भाऊ" जे पानिपत मद्धे आपले सर सेनापती होते, सगळ्या युद्धाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. इतकं मोठं ते चरित्र, अहो आता हरीयानातले लोक त्यांच्या नावाचे गाणे गातांना दाखवले. "चमकता रहेगा भाऊ बनके तारा", हे शब्द ऐकून कान अगदी तृप्त झाले. खरच ज्यांना पानिपत माहित आहे, त्यांना भाऊ बद्दल नक्कीच आदर असेल. किती बिकट परिस्थिती होती तेव्हा मराठ्यांची. ४-४ दिवस जेवण नव्हतं मिळत, इतके हाल झाले होते. इतक्या लाखो लोकांच्या काळजीने परेशान करून टाकलं होता त्या महान आत्म्याला. तो लढला, अगदी शेवट पर्यंत लढला. सदाशिवराव भाऊ, चिमाजी आप्पांचेच तर सुपुत्र होते, जे चिमाजी आप्पा वसई चा किल्ला जिंकता येत नव्हता म्हणून आपल्या साथीदारांना म्हणाले होते कि, माझं शीर कापून तोफेला लावा म्हणजे मी नाही तर माझं शीर तरी पोहोचेल किल्ल्यात.  इतके ते शूर पराक्रमी, भाऊ म्हणजे त्यांचंच तर रक्त, माघार कशी घेणार. इतक्या प्रतिकूल परस्थिती मद्धे लाखो लोकांचं नेतृत्व करण्याचा बाका प्रसंग कदाचितच कोणावर आला असेल.

आपल्या महाराष्ट्रात सदाशिवराव भाऊच इतकं नाव कोणी काढत नाही, म्हणजे त्यांच्या वर लिखाण झाल आहे थोड फार पण, इतर मराठी चरित्रांकडे बघता भाऊच्या वाटे थोडी उपेक्षाच आली आहे अस वाटतं. पण उत्तर भारतात त्यांच्या कर्तुत्वावर गाणे लिहिले गेले आहेत, त्यांच्या भाषेत पोवाडे लिहिले गेले आहेत. आजही तोंडी पाठ आहे त्यांच्या, भाऊने इतकी काय छाप पाडली होती, जी आज पर्यंत तिथले लोक नाही विसरलेत. आजच्या काळात तिथे जर कोणी मोठा पराक्रम दाखवायला लागला तर लोक म्हणतात कि, 'बडा सदाशिवराव भाऊ बनता है...'. हिंदी भाषेत आपल्या एका महान मराठी सेनापती बद्दल इतकी मोठी वाक्य, छान गाणी म्हणत असताना बघत खरच छाती चौडी झाली हो.    

त्या युद्धाच्या काळात मराठे जिथे जिथे गेले होते, त्या जागा दाखवल्या. ती एक एक जागा बघतांना अंगावर खरच काटे आलेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी शूर मराठयांच रक्त सांडलेलं होतं. दत्ताजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले आणि कित्तेक वीर धारातीर्थी पडलेले. दत्ताजी बद्दल काय लिहिणार.....? पानिपतच्या युद्धाची सुरुवात खर तर यांच्याच मृत्यूने झाली. ते इतके शूर, निर्भयी होते कि, पूर्ण घायाळ होवून पडलेले असता आणि वरून क्रूर अफगाणी सैनिक छाती वर पाय ठेऊन उभा असताना  देखील म्हणाले होते कि, "बचेंगे तो और भी लडेंगे". खरच शब्द नाही त्यांचे वर्णन करण्यासाठी. 
                 
विश्वासराव, जे पुढे पेशवा होणार होते, अवघ्या १७ वर्षाच्या वयात तेथे विरगतीला प्राप्त झाले. समशेर बहाद्दर(बाजीराव-मस्तानी यांचे सुपुत्र) पण त्याच वयातले. जनकोजी शिंदे आणि असे कित्तेक हिरे, मोती महाराष्ट्राने कायमचे गमावले त्या दिवशी. परिस्थिती इतकी वायीट होती कि कोणतं शीर कोणत्या धडाच हे नंतर कोणालाच कळल नाही. पानिपत चा विचार येताच डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही. आपण ज्या दिवशी तिळगुळ वाटतो, त्याच दिवशी काही शतकांपुवी कित्तेक शूर मराठे रक्तात न्हायीले होते, हजारो लाखोंच्या संखेत. संक्रांत कोसळली, हा वाक्प्रचार तिथूनच अस्तित्वात आला. अहमद शाह अब्दाली जिंकला तर सही पण त्याची इतकी भयंकर नुकसान झाली, कि परत तो पानिपतच्या वाटेल नाही गेला. त्याची हिम्मतच झाली नाही. तो जिंकून पण पूर्णपणे हरला होता, आणि मराठे हरले होते पण अभिमान वाटावा अश्या रीतीने, कारण ते लढले होते हिंदुस्थानासाठी..हिंदूंसाठी. अब्दाली काय पण वायव्य सीमेवरून परत कोणाची हिम्मत नाही झाली भारतावर आक्रमण करायची. 

पानिपतच इतकं घनघोर युद्ध, जे दुपार पर्यंत आपण जिंकत होतो पण तेच संध्याकाळ होता होता अब्दाली जिंकला. पानिपत म्हणजे नुसतं एक युद्ध नव्हतं, तर ते एक उत्तम उदाहरण होतं मराठी नेतृत्वाच, निर्भयता, शूर वीरता आणि पराक्रमाचं. ते महायुद्ध एका दिवसात संपलं, पण त्याची छाप अजूनही कायम आहे, महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि मराठी मनावर.           
               

No comments:

Post a Comment