Tuesday, November 22, 2016

साले...चोर कुठले...


ह्या विषयाची सुरुवात कशी करावी काही कळत नाहीये. फार राग येतोय. नेहमीचंच झालंय त्यांचं म्हणून वाटलं जरा लिहूनच काढू आणि मन मोकळं करू. मी बोलतोय ते पेट्रोल भरणाऱ्या चोरांबद्दल जे पेट्रोल पंपावर आपलं ''कर्तव्य'' निभावत असतात.

किस्सा असा कि माझ्या घराजवळच्या पेट्रोल पंपावर माझं भांडण झालं (४-५ वेळी) म्हणजे, ० रिडींग न दाखवणे, मधेच मागून कुणी 'बिल पाहिजे का?' असं बोलून लक्ष विचलित करणे वगैरे कारणांवरून.
वाटलं जरा पेट्रोल पंप बदलूया (जास्त अपेक्षा न ठेवता, कारण सगळी कडे असे चोर भरलेले आहेतच). मग चिंचवडला हायवे जवळ असलेल्या पंपावर जायला लागलो. १-२ वेळा ठीक वाटलं. तिसऱ्या वेळी गेलो, तीनदा म्हणालो ५०० चं टाक. त्याने टाकलं १००चं. हि ह्या चोरांची जुनी युक्ती. १०० म्हणून त्याने १ रुपयाचं सुद्धा भरलं नाहीये ते मला कळलं. माझी चांगलीच सटकली.
मी झालो सावध, त्याला फक्त हातवारे करून म्हणालो कि हे काय केलं? त्याने असा चेहरा केला कि अरेरे चुकून झालं.
...अरे साहेब मला १०० ऐकू आलं. १५० चं भरू का?
का रे? किती येतं १५० मध्ये?
...२ लिटर
कर तर हिशोब...२ लिटरला १५४ लागतात. वरचे तू टाकणार का?
त्याच्या कडे उत्तर नव्हतं. कसं असणार. त्याला कळलं कि चोरी पकडली गेली.
मग त्याने टाकलं ४०५ रुपयाचं पेट्रोल...अजून एक जुनी युक्ती (मुद्दामून थोडंस जास्त टाकणे) .
त्याला म्हणालो टोटल कितीचं टाकलं रे?
..५०५ चं साहेब
...परत हे वरचे ५ रुपये तू टाकणार का? काय कारण?
माझा आवाज वाढला कारण मला सहनच होईना. आजू बाजूचे लोकं बघायला लागले.
म्हणालो...चल पूर्ण पेट्रोल काढ गाडीतून, मोजून दे मला. चोरलं नसेल तर सगळ्या लोकांसमोर तुझी माफी मागेल.
त्याला सगळं कळलं होतं..त्याचा चेहरा थोडा पडला.
मी पण जे होईल ते बघूचं असं ठरवून गाडी मॅनेजर च्या केबिन समोर लावली. सगळ्यांना सांगितलं कि मला पेट्रोल मोजायचं आहे. मागून तो आला थोडं गया वया करू लागला.
...साहेब जरा प्रॉब्लेम चालू आहे घरी, लक्ष नव्हतं (वगैरे वगैरे).
...ते मला नको सांगू. कितीचं पेट्रोल मारलं ते सांग?
तो काही बोलेना आणि पेट्रोल काढून मोजायला पण तयार होईना. मग निघून गेला कारण मागे लाईन वाढली होती. तेव्हड्यात मॅनेजर साहेब आले. मी त्यांना किस्सा सांगितला.
त्यांना पण कळून चुकलं कि चोरी झालीये म्हणून. ते म्हणाले साहेब पैसे नका देऊ, जा तुम्ही.
मी म्हणालो मला पण काही फुकट नाही पाहिजे. त्याला विचारा कि खरंच कितीचं भरलंय, तेव्हडे पैसे देतो मी.
मॅनेजर म्हणाला... साहेब तुमचे पण पैसे काही फुकट नाही आलेत तुम्हाला कमवावे लागतातच ना? मी त्याच्या पगारातून कापून घेतो, जरा घडू दे त्याला अक्कल. जा तुम्ही.
मी परत पैसे देण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. मग म्हणालो असो...
मी निघणार तेव्हड्यात तो चोर आला...म्हणालो तुझ्या मॅनेजरशी बोल आणि निघून गेलो.

असो. विषय हा कि सकाळी सकाळी आपण घाईत असतो आणि त्यातल्या त्यात कुणी आपल्या समोर आपल्याला फसवतोय आणि आपण काहीच करू नाही शकत? फार वेदना दायक गोष्ट आहे हि. जर आपल्याला नाही कळलं कि पेट्रोल मारलं गेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर का आपल्याला कळलं, कि पेट्रोल मारल्या गेलं आहे मग दिवसभर मनाची तळमळ सुरु असते. विषय त्या ३०-४० रुपयांचा नसतो तर मला कुणी तरी फसवलं आहे ह्या ग्लानीचा असतो. हा अनुभव फार वेदनादायक आहे. हा जरा जुना किस्सा होता, ह्या नंतर माझं चिंचवड, हिंजवडी, खराडी इथल्या बहुतेक पेट्रोल पंपावर भांडण झालंय. तुम्हाला माहित नसेल पण हे लोक दिवसाचे २-३ हजार असेच कमवतात (पगारा व्यतिरिक्त)    

इथे मी लिहू शकतो म्हणून ह्या चोरांच्या काही युक्त्या तुम्हाला सांगतो, आशा करतो कि तुम्हाला पटेल.
१. १०० म्हटलं कि म्हणतात ११०-१२० चं भरू का? वरचे १०-२० मारण्यासाठी असतात (एव्हाना १०० मधून तुमचं पेट्रोल त्याने मारलं असेल पण. कारण ज्याला प्रामाणिक पणाने पेट्रोल भरायचं आहे तो असं काहीच विचारत नाही)
२. तुम्ही ५०० म्हणाले आहे त्याने १०० चं टाकलं तर समजून घ्या कि तुमचं १०० चं पेट्रोल मारलंय. अगदी १००%.
३. पेट्रोल भरत असतांना... बिल पाहिजे का? म्हणणारे नेहमी पाठी मागूनच येतात. तुमचं लक्ष गेलं तर पेट्रोल गेलंचं समजा.
४. पेट्रोल भरत असतांना त्याने अचानक ट्रिगर दाबणे आणि तिथून पुढे परत भरण्यास सुरु करणे. (सेन्सर मुळे ट्रिगर आपोआप बंद होतो,  आपोआप झाल्यास काही प्रॉब्लेम नाही. त्याने बंद केल्यास समजून घेणे)
५. पेट्रोल भरत असताना ते मुद्दामून लक्ष विचलित करतात उदा. अरे साहेब हा स्क्रॅच कधी पडला? तुम्ही तिकडं बघितलं रे बघितलं तर गेलंच तुमचं पेट्रोल.
६. ५०० ऐवजी ५०३-५०४ चं टाकलं तर समजा त्याने पेट्रोल मारलंय. मित्रांनो आपल्याला फुकट पेट्रोल देणारा तो इतका काही मूर्ख नाहीये. आपल्याला वाटतं अरे ३ रुपयाचं याने जास्त भरलंय, फायदाच झाला कि आपला. आपण खुश होतो आणि निघून जातो. जर का चेक करायचा असेल ना तर त्याला म्हणा कि कॉम्पुटर रिसिप्ट दे? बघा किती घाबरतो तो.  

मित्रांनो आपले अधिकार जाणून घ्या. तुम्हाला वाटलं कि पेट्रोल चोरी झाली आहे  तर तुम्ही ते पेट्रोल काढून त्यांच्या कडून मोजून घेऊ शकता. सीसी टीव्ही बघू शकता. सगळ्यात महत्वाची ती कॉम्पुटर रिसिप्ट आहे. तिच्यात अगदी किती पेट्रोल भरलं आणि त्याची किंमत किती होते अशी माहिती छापून येते. सगळेच चोर नसतात पण पेट्रोल पंपावर कायम सावध राहा. इथे घाई नकोच.

काय करणार यार आपण सामान्य मनुष्य आहोत पण आपल्यालाच त्रास जास्त होतो त्यामुळे एकमेकांना अशी माहिती देऊन आपली होत असलेली लूट थाम्बवण्याचा पयत्न करूया.
   

     


Sunday, July 10, 2016

पुणेरी फटका


मी खाली जे काही किस्से लिहिले आहेत ते अगदी सत्य आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधले केदार यांच्या सोसायटीत नेहमी घडत असलेले हे किस्से. कधी कधी रिकाम्या वेळेत ते असे किस्से सांगतात. त्यांच्या सोसायटीत फक्त 5-6 फ्लॅट आहेत. केदार सर सोडून सगळे लोक रिटायर्ड आणि जरा वयस्करच आहेत. सगळे मिळून 12-15 लोकं असतील. तरीही सगळ्यांना सांभाळणं किती अवघड आहे याचा  खालील किस्से वाचून तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल. 

किस्सा 1 - काका लाईट बंद का करतात ?
काही दिवसांपासून शेवटच्या आणि पहिल्या मजल्या वरचे काका यांची झाली दुश्मनी, म्हणजे ते एकमेकांशी बोलेना झाले. याचं कारण ऐका. ते असं की शेवटच्या मजल्यावर राहणारे काका सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी लवकर उठतात अगदी 5 ला आणि बाहेर निघतात. घरातून निघतांना ते प्रत्येक मजल्या वरचे लाईट बंद करत जातात. छोटीशी सेवा. पण यावर कुणाला काही ऑब्जेक्शन असायला हवं का? पण पहिल्या मजल्यावरचे काका चिडले. का तर ते म्हणतात माझ्या मजल्या वरची लाईट तुम्ही का बंद करतात. मीच ती बंद करणार. त्या बटणाला माझ्या शिवाय कुणीच हात लावायचा नाही. दोघांची चांगलीच जुंपली. इतकी की एकमेकांकडे ते बघत पण नाही यार. 

किस्सा 2- काकू रस्त्यावर गाडी लावू देत नाहीत 
आपण आपल्या सोसायटीत गाडी कुठे लावावी ह्या बाबत नियम पाळणे नक्कीच आवश्यक आहे कारण त्या जागेचा मालक तुमच्या वर ओरडू शकतो आणि विषय वाढू शकतो. सहसा असं कुणी करणार नाही. पण जर का तुम्ही रस्त्यावर जे अलिखित नियम आहेत ते पाळत नीट गाडी लावत आहात अगदी तुमच्या सोसायटी बाहेरच तर यावर सोसायटी मधल्या कुणाला काही आक्षेप असायला हवा का? नाही ना... 
एक काकू एका ड्रायव्हर ला रस्त्यावर एका ठिकाणी गाडी लावू देत नव्हत्या कारण..कारण की ती जागा त्यांच्या फ्लॅट पासून अगदी जवळ आहे. म्हणजे त्या घरातून निघाल्या की लगेचच गेट बाहेर गाडीत जाऊन बसू शकतात अशी ती जागा आहे. त्यामुळे त्यांची गाडी सोडून त्या तिथे कुणाला दुसऱ्याला गाडी लावू देत नाहीत किव्वा लावल्यास ओरडतात. रस्त्यावर पण आपला मालकी हक्क दाखवायला कमी नाही पडल्या त्या. तुम्हीच सांगा कसं होणार यांचं ? आणि केदार सांगतात की हे लोक अगदी स्पष्ट आणि इतक्या आत्मविश्वासाने बोलतात की समोरच्याला खरंच आपण काही चूक केली आहे असं वाटतं.

पाण्याची मोटर कधी लावली ह्यावरून चाललेल्या एका चर्चेत एक काकू म्हणाल्या की आमच्या ह्यांना साठवून ठेवलेलं पाणी आवडत नाही. त्यांना नळातून भरलेल्या बादलीच्या पाण्याने आंघोळ करायला आवडते...... आत्ता बोला ह्यावर. 
पाण्याविषयी भरपूर गोंधळ असतात सगळीकडे. आता सगळ्यांनी ठरवलं होतं की एकाच वेळी पाण्याची मोटर चालणार, तरी काही काका काय करतात की ते एक बारीक काठी घेतात आणि अगदी निशाणा लावून लोखंडी कपाटात बंद असलेल्या मोटारीचे बटन अगदी कौशल्य पूर्ण चालू करतात अगदी त्यांना वाटेल तेव्हा....... नुसता कहर आहे हो... :) 

अजून भरपूर किस्से आहेत जे सांगतांना केदार यांना हसू कंट्रोलच करता येत नाही. 

खरं तर असे लोकं अगदी सगळी कडे असतात म्हणजे आमच्या इथेही एक व्यक्ती 24 तास प्यायचे पाणी का पाहिजे ह्या साठी म्हणतो की मला रोज जेवतांना नळातून तांब्या भरून घ्यायची सवय आहे. बघा. पुणेकर ह्या विषयी प्रसिद्ध आहेतच :) पण काही लोकांचा स्वभावच असा असतो आणि स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. असो.... पण मग ज्या लोकांना रोज अश्या काही काका काकुंशी लढायचे असते त्यांना देव शक्ती देवो अशीच प्रार्थना.   
Sunday, July 3, 2016

पाऊस असा रुणझुणता...

3-4 दिवसांपासून पावसाने बराच जोर धरला होता. अगदी शांतपणे त्याच बरसंन चालू होतं. आमच्या बाल्कनीच्या बाहेर एक मोठं अशोक झाड आहे. ते अगदी शांत पणे उभं होतं पाऊस अंगावर घेत. वारा अजिबात वाहत नव्हता. सगळी कडे शांतता. दुपार असल्याने वाहने देखील कमी होती  रस्त्यावर. फक्त पावसाचा स्स्स्स्स आवाज येत होता. ते झाड जोरात डोलत नव्हतं. कधीतरी झाडाच्या फांद्या हळुवार हलायच्या. असं वाटत होतं की त्या पावसाला हळूच इशारा करत होत्या, अनुमोदन देत होत्या की असाच बरसत रहा

पाण्याचे नाजूक थेम्ब पानांवर पडत होते, त्या क्षणा   पुरतं ते पान जोरात हलायचं आणि मग हळूच तो थेम्ब घसरून पानाच्या टोकावर यायचा. काही क्षणापुरता तेथेच रेंगाळत रहायचा. त्याची खाली पडण्याची इच्छाच होईना. शेवटी आपले रूप खुलवून दाखवत तो थेम्ब काही क्षणापुरता तेजोमय व्हायचा आणि झोका घेत खाली कोसळायचा

ते संपूर्ण झाड थोडं वाकून गेलं होतं, त्याच्या फांद्या आणि सगळी पाने देखील. पण रंग मात्र उजळला होता. असं वाटत होतं की त्या झाडाने स्वतःला अगदी समर्पित करून टाकलं होतं त्या पावसासमोर. जसं की एखादा प्रियकर आपल्या प्रियेसीचा अंगावर रंग उधळत होता आणि तिला देखील ते आवडत होतं. तिने लाजून मान खाली घातलेली होती आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. अंग अगदी ओलंचिंब झालं होतं पण मन अजून भरलेलं नव्हतं. ती हळूच चोरून त्याच्या कडे बघत होती आणि त्याने परत रंग टाकला तर लाजून मान फिरवत होती. मनात एकाच विचार की तू असाच रंग उधळत रहा माझ्यावर. कधी हळुवार तर कधी खुपसारे एकसाथ. असच पावसाचं चालू होतं कधी हळू तर कधी तो वेगात बरसत होता. आणि ते झाड अगदी शांतपणे उभं, कारण त्याला पण ते हवंच होतं.Thursday, July 18, 2013

सांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - 2


पहिला भाग इथे वाचा

पुढची वाट हि थोडी सरळ आणि थोडी वळणाची होती. उजव्या बाजूला अगदी लांब  पर्यंत पाहू शकत होतो कारण त्या बाजूला जास्त करून शेती होती आणि जेथे शेती नाही तेथे होती हिरव्या गवताची कुरणं. ती असंख्य गवताची पाती समुद्रात उठणाऱ्या  पाण्याच्या लहरिन्प्रमाने लहरत होती. अगदी हिरव्या लहरी वाटत होत्या त्या. तिथला गार वारा नुसती ती गवताची पाती नाही तर माझं मन देखील डोलवत होता...आनंदाने.
त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूला थोडं दूर तो हरिश्चंद्र गड, स्पष्ट दिसत होता, विस्तीर्ण असा, शांतपणे उभा, कित्तेक शतकांपासून. छान प्रवास चालू होता. माझ्या चारही बाजूला निसर्गाचे अप्रतिम नजारे होते. दोन डोळे कमी पडत होते हो सगळी कडे बघायला. 

आता मागे सांगितल्या प्रमाणे खरा माळशेज घाट सुरु झाला. रस्ता चांगला होता आणि हळूहळू उंचावर पोहोचलो आहोत असा फिलिंग यायला लागला कारण आता माझ्या उजव्या बाजूला खोल दरी होती आणि तिच्या पुढे ताट मान करून आणि हिरवा कोट घातलेले मोठ मोठे पर्वत. काही क्षण तुमची नजरच हटणार नाही असे काही. आता प्रवास होता मोठ मोठ्या पर्वतांच्या माळेतून आणि हिरव्या गार निसर्गातून. असे मोठे डोंगर अगदी नजर पोहोचत नाही तिथ पर्यंत पोहोचलेले, असा नजारा तुरळकच पाहायला भेटतो. काही वळणांवरून आपण घाटाचे रुद्र रूप पाहू शकतो. लांबून पाहून खरच भीती वाटते, पण त्याच्या जवळ गेल्यास तो आपल्याला तितकाच सुंदर वाटतो. काही ठिकाणी प्रवाश्यांना निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी खास जागा बनवलेल्या. तिथून हे काही फोटो काढले, घाटाचे आणि निसर्ग सौंदर्याचे. घाटात भरपूर अश्या जागा होत्या कि तेथे गाडी वरून उतरून हि जागा बघितलीच पाहिजे आणि इथला फोटो काढलाच पाहिजे असा फिलिंग आला. जितकं जमेल आणि जेथे जमेल तिथे मी थांबलो आणि डोळ्यात व क्यामेऱ्यात ते सौंदर्य भरून भरून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. हा घाटातला प्रवास असाच चालू  राहावा असा अगदी मनापासून वाटत होतं पण...असो. सांधण दरी राहून जायची, म्हणून मना आवरत घेतलं.


माळशेज घाट, खरच न विसरण्यासारखा आणि परत नक्की येण्यासारखा :) जे लोकं ह्या रस्त्याने (नगर कल्याण हायवे) नेहमी प्रवास करतात, त्यांच्या सारखा आनंदी, उल्हासि, मजेशीर, न थकवणारा प्रवास क्वचितच कुणाचा होत असेल. असो.
घाट संपल्या नन्तर अगदी झकास रस्ता लागला, दोन्ही बाजूने घनदाट झाडी असलेला. हा हायवे सरळ कल्याण ला जातो. मला जायचं होतं उजव्याबाजूला, म्हणून काही अंतराने नंतर हायवे सोडून उजव्या बाजूला वळालो. तेथून भरपूर छोट्या वाड्या, खेडी ओलांडत डोळखांबला पोहोचलो. हायवे वरून इथे पोहोचता पोहोचता मी जवळ पास २५-३० किमी गाडी चालवली होती आणि नंतर मला अंदाज आला कि लोकं ठाणे जिल्ह्याचं विभाजन का करायला बघत आहेत. कारण ज्या एरियातून मी जात होतो तो पूर्णपणे आदिवासी एरिया होता. काहीच विकास नाही. दूर दूर पर्यंत मोठ मोठे डोंगर दिसत होते, मधेच छोट्या छोट्या अनेक नद्या लागल्या, आणि त्यांच्यावर मासे पकडत असलेले भरपूर आदिवासी जोडपे दिसले. रस्ता कुठे चांगला कुठे वायीट. मला कळतच नव्हतं इथल्या लोकांच जीवन कसं चालत ते. जे ठाणे आपल्याला दिसतं त्याच्या अगदी विरुद्ध इथलं चित्र होतं. विभाजन झालं तर काही होयील तरी. म्हणजे तशी आशा तरी करू.  
        
मला जायचा होतं घाटघर धरणावर, कारण तिथून सांधण दरी अगदी जवळच होती. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं मोठं घाटघर धरण कुणालाच माहित नव्हतं. कुणाला म्हणजे कुणा लाच नाही. मला यायला लागलं टेन्शन कि च्यायला कुणालाच कसं माहित नाही हे धरण. दुसरं ऑप्शन नसल्याने गुगल ने सांगितल्या प्रमाणे मार्गक्रमण करत होतो.  मग फार पुढे एका व्यक्तीने 'कुणालाही चौन्ढा प्रकल्प असं विचारा कुणीही सांगेल, तोच घाटघर प्रकल्प आहे' असं सांगितलं. असा इशु होता तर, पुढे मग चौन्ढा प्रकल्प विचारत गेलो आणि सगळे व्यवस्थित मार्ग दाखवायला लागले. पोहोचलो एकदाचं चौन्ढ्याला. पण तिथे पोहोचल्यावर कळल कि साम्रद गावाला (सांधण दरीला) जायचा रस्ता आहे इथून पण गाडी नाही नेता येणार, कारण ते गाव समोर असलेल्या डोंगरा पलीकडे आहे. जर का गाडी घेऊन जायचं असेल तर १०० किलोमीटर लांबून जावं लागेल म्हणजे कसारा-इगतपुरी-भंडारदरा या मार्गाने. घ्या आता कळूनच चुकलं होतो कि मी चांगलंच चुकलो आहे. पण परत १०० किमी गाडी चालवण्याची ताकद नव्हती कारण ओल्रेडी १८० किमी गाडी चालवून झाली होती. मग वाटलं कि हा डोंगर चढून जाणे सोपे आहे, इतकी गाडी चालवण्यापेक्षा.

मग आलो धरणावर. तिथली सिक्युरिटी गार्ड्स फारच चांगली मानसं निघाली. त्यांनी सांगितलं गाडी येथेच लावा आणि जा, काही प्रोब्लेम नाही. त्याप्रमाणे केलं, आणि एक तर माझ्या बरोबर पुढे पर्यंत आला डोंगरावरची वाट दाखवायला. एव्हाना माझे मित्र दत्ताच्या घरी (साम्रद गावी) येउन पोहोचले होते, त्यांना म्हणालो कि तुम्ही पुढे निघा मी पोहोचतोच मागून. साम्रद गावाला पोहोचण्यासाठी मला जो त्रास झाला तो काही येथे लिहित नाही. पण एक गोष्ट नक्की कि मी ह्या अनुभवातून चांगलंच शिकलो...असो.

हाच तो रतनगड
दत्ता मला त्या डोंगरावर घ्यायला आला होता, आणि नंतर काही मिनिटात मी पण पोहोचलो साम्रद्गावी. माझे मित्र मी सांगितल्याप्रमाणे पुढे निघून गेले होते. मी पण ५-१० मिनिट आराम केला आणि निघालो सांधण दरी कडे. फक्त दत्ता आणि मी.  जर चुकल्या सारखं वाटत होतं कारण जीवाभावाचे मित्र बरोबर नव्हते, म्हणून लवकरच त्यांना गाठायचं ठरवलं. दरी कडे जातांना समोरच हा रतनगड दिसला. भयंकर घाई होती तरी पण फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता. मागे ह्या गडावर गेलो होतो पण वेगळ्या रस्त्याने. असो..आता त्याच्या बद्दल विचार करण्याचा वेळ नव्हता. दत्ता जोरात चालला होता आणि मी देखील (फोटो काढत) :). अगदी काही मिनिटातच पोहोचलो सांधण दरीच्या तोंडाशी. हिच ती सांधण दरी जिला Valley of Shadows असे देखील म्हणतात. आता पुढचा प्रवास होता ह्या दरीतून खाली खाली जाण्याचा...

  

Sunday, July 7, 2013

सांधण दरी (Sandhan Valley) - करोळी घाट आणि मजा - भाग - १

सांधण दरी (Sandhan Valley)........ नुसता जीव जळायचा हो, जेव्हा जेव्हा गुगल किव्वा इतर मित्रांच्या ब्लॉगवर ह्या दरीचे फोटो पहायचो. किती वेळ नुसते ते फोटो बघत बसायचो मी. कधी जायीन कधी ती दरी बघेन असं व्हायला लागलं होतं.

असेच ब्लॉग वाचत असतांना दत्ता भांगरे याचा फोन नंबर भेटला (८६०५१५१६४१, ९३२५९२६३४१). लगेच त्याला फोन केला आणि सगळी माहिती घेतली. दत्ता हा साम्रद गावाचा रहिवाशी. सांधण दरी याच्या घरा पासून अगदी १०-१५ मिनिटाच्या अंतरावर. रतनगड, अलंग, मदन आणि कुलंग ई डोंगर हे देखील गावाच्या आजू बाजूच. तो म्हणाला कि खाण्याची, rappling करून खाली उतरवून द्यायची, परत गावात आणण्याची सगळी व्यवस्था करेन, प्रत्तेकी ६०० पर्यंत खर्च येयील. मेंबर वाढले तर पर हेड खर्च कमी होयील. पण पाऊस खूप आहे दरीकडे अजिबात जाता नाही येणार म्हणून आता नका येऊ असं पण म्हणाला. त्याने नोवेंबर मध्ये यायला सांगितलं. आता इतके दिवस वाट पाहिली, थोडे आणखी दिवस पाहू असं म्हणून तयारीला लागलो.  

मित्रांना सागितलं, जमवाजमव सुरु झाली. सगळे हो म्हणाले आणि सगळ्यांच्या सोयीचा विकेंड शोधला. सांधण दरी विजय सोडून बहुतेक जणांना माहित नव्हती. त्यामुळे सगळेच फार आनंदी आणि उत्साही झाले. उत्साहाचं दुसर कारण होतं कि फार दिवसांनी असे सगळे निघणार होतो. 


मग ते सगळे नाशिक वरून आणि मी पुण्या वरून येणार असं ठरलं, कारण नाशिकला जाऊन परत प्रवास नसता जमला मला (असं केलं असतं तर बर झालं असतं..असो.. सांगतो नंतर). तयारी झाली आणि शनिवार नक्की झाला. त्या शुक्रवारची रात्र फार मोठी वाटली, संपेचना हो. शेवटी माझी मीच पहाट केली :), तयार झालो, मित्रांना फोन केला, ते निघाल्याची खात्री केली, माझी Avenger काढली आणि निघालो. जवळ जवळ ५ वाजले होते. मी ज्या रस्त्याने जाणार होतो तो सांधण दरीकडे जाण्याचा खरा रस्ता नव्हता हे मला नंतर कळलं अगदी तिथे जवळ पोहोचल्यावर. मी पोहोचलो तिथे पण जरा उशिराने...असो. सविस्तर लिहितोच पुढे ह्या बद्दल. पण मित्रांनो एकच महत्वाची गोष्ट  सांगावीशी वाटते ती म्हणजे कि कुठेही नव्या ठिकाणी जाण्या पाहिले जरा माहिती काढा आणि मगच निघा. 

सकाळचा प्रवास लवकर होतो कारण रहदारी कमी असते, म्हणून लवकरच नारायणगावला पोहोचलो. बस डेपो पासून डावी कडे वळायचं, आणि २ मिनिटात तुम्ही जुन्नर च्या रस्त्याला लागतात. रस्ता तसा छान होता. २०-२५ मिनिटात जुन्नरला पोहोचलो आणि मुख्यचौकातून उजवीकडे वळालो. हा रस्ता गणेशखिंड मार्गे माळशेज घाटात जातो. गणेशखिंड - इथे पोहोचण्याचा रस्ता अगदी वळणावळणाचा होता. अंतर जरा कमी पण आजू बाजू अगदी घनदाट झाडी होती. मग पोहोचलो एकदाचं गणेश खीन्डीत. जरा उंचावरच पोहोचलो होतो आणि खरच खिंडीचाच प्रकार, म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला काळ्या दगडाचे डोंगर आणि मधून हा रस्ता. सकाळ पासून भरपूर गाडी चालवली होती, वाटलं थोडं थांबावं इथे म्हणून खिंड संपल्यावर बाजूला गाडी थांबवली. हेल्मेट काढलं, क्यामेरा काढला आणि समोर बघू  लागलो. समोरच दृश्य एका दृष्टीक्षेपात  मावणार नाही अस होतं म्हणजे उंच उंच डोंगर अगदी नजर पोहोचत नाही तिथ पर्यंत पसरलेले, मोठं धरण, डोंगराच्या कुशीत बसलेले गाव, घाटातला रस्ता आणि थोडं जंगल. सगळं काही होतं ह्या दृश्यात आणि ह्याला साथ होती गार रान वाऱ्याची आणि हलक्या धुक्याची. असं वाटत होतं कि हि गणेशखिंड आपल्याला सह्याद्री च्या कुशीत जाण्याचा मार्गच उघडून देत आहे..वाह अगदी अप्रतिम असं दृश्य होतं ते.   

काही फोटो काढले आणि लागलो पुढच्या मार्गाला. गणेश खिंडीचा घाट पार करतांना चांगलीच कसरत झाली म्हणजे गाडी चांगलीच हळू चालवावी लागली.  उतरलो घाट एकदाचा आणि लगेचच थोड्या पुढे एकदम झकास रस्ता लागला हो. वाह मग काय चांगलीच गाडी बुन्गवली. डाव्या  बाजू हिरवा निसर्ग, उजव्या बाजूला धरण असा रस्ता होता. काही वेळात माळशेज घाट लागणार होता. आज पर्यंत कधीच योग आला नव्हता ह्या रस्त्याने जायचा. खूप ऐकलं होतं भरपूर लोकांकडून कि अगदी झकास घाट आहे म्हणून एकदा तरी जायलाच पाहिजे. आज योग आला होता आणि मी पुरेपूर आस्वाद घेण्यास सज्य होतो.  


क्रमशः


                              

                              
             

Sunday, October 21, 2012

'अन्जीनेरी...- १'अन्जीनेरी...किती  जवळ होतं यार घरापासून म्हणजे अगदी १ तासाच्या अंतरावर पण बघा इतकी वर्षे झालेत
पण कधी पार नाही करता आलं. ह्यावेळी पण नाही जमणार म्हणून आशा सोडून दिली होती. कारण सकाळचे 
११ वाजले  होते पण घरीच होतो   वाटलं होतं कि पोरं गेली असणार पुढे काल मी नाही म्हणालो म्हणून. काही 
अपरिहार्य  कारणे होती म्हणून नव्हतं जमणार,  मित्रांना पण पटलं होतं ते. पण  नाही हो ११वाजले तरी आले 
गळे घरी. पण घरात मला बोलवायला यायची कुणाची हिम्मत होयीना (थोडं समजलंच असेल तुम्हाला ) मग
काय घरी थोडा वादविवाद, शाब्दिक चकमकी, थोडा शब्दांचा कोटी क्रम आणि शेवटी मी निघालो. :)

जरा पावसाचं वातावरण होतं,  आणि त्र्यंबकेश्वर कडे तर कायम पाऊस असतो हे पण आम्हाला माहित होतं  
स्त्याला लागलो. पावसाव्यतिरिक्त दुसरी काही अडचण वाटत नव्हती. सातपूरला  फेमस 'अंबिका' मध्ये 
नाश्तां पाणी केला. बरोबर वडा पाव घेतले. हरीने घरून भरपूर काही आणलच होतं. तिथे पोहोचण्यासाठीचा 
रस्ता बऱ्यापैकी होता. लवकरच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. पण पुढे थोडा कच्चा रस्ता दिसत होता 
म्हणून हळू हळू गाडी टाकली त्या रस्त्याने. फार लांब पर्यंत पोहोचून गेलो हो, म्हणजे अगदी अन्जीनेरीचा 
खरा डोंगर चालू होतो त्याच्या पायथ्याशी. पूर्वी गाड्या खाली लाऊन ह्या रस्त्याने चालत यावं लागायचं. चला 
थोडा तरी फायदा झाला. गाड्या लावल्या आणि लगेचच चढायीला सुरुवात केली. 

अन्जीनेरी- म्हणजे 'रामभक्त हनुमान' यांच जन्म स्थाण. लहानपणा  पासून खूप ऐकल होत यार ह्या जागे 
बद्दल, तिथे असलेल्या हनुमानाच्या पायाने बनलेल्या तलावाबद्दल. हि जागा जितकी  निसर्गरम्य  आहे 
तितकीच आपणासाठी पवित्र पण. आज ती बघण्याची इछ्या पूर्ण होणार होती.

सुरुवातीची वाट, सोपी वाटली. चांगल्या पायऱ्यांचा रस्ता होता. वर थोडं दूर पर्यंत जात असलेल्या दिसल्या. 
आजूबाजू भरपूर/भरगच्च हिरवी झाडे होती, म्हणून जास्त पुढच काही दिसत नव्हतं. अश्या वाटांवर चालत 
असतांना आपल्याला कायम कुतूहल वाटत असते कारण पुढे काय असणार याचा अंदाज करताच येत नाही. 
थोड्याच पुढे ती घनघोर जंगलासारखी वाट संपली आणि आता उजवी कडे मोठा डोंगर आणि डावी कडे दरी 
असा प्रवास चालू झाला.

वाट काहीच अवघड नव्हती. म्हणजे थोडी अरुंद होती  इतकच. खर तर आल्हाददायक वातावरणात वाट कशी 
सरते ते कळत नाही आणि सोबत सवंगडी असले  तर काही विचारनच नको. सगळे  खुश होतो. माकडांची
 चांगलीच साथ लाभली होती (खरोखरच्या :)). सगळीकडे पसरलेले होते ते, आणि अस वाटायचं कि सगळे 
आमच्या कडेच बघत आहेत. आमच्या मागून एक ७-८ जणांचा  गुजराती ग्रुप येत होता. त्यात काही लेडीज 
होत्या, एकीची पिशवी तिथे असलेल्या एका माकडाने जोरात हिसकवली.  ती बाई  इतकी घाबरली कि काय 
सांगू. चांगलीच जोरजोरात  रडायला लागली हो. बेशुद्ध  पडते कि काय  असं वाटत होतं सगळ्यांना (आणि 
त्यांच्यातलेच काही लोक दात काढत उभे होते). वर जायची योजना रद्द करावी असे सूर उमटायला लागले होते. 
असो. आम्हाला काय असं समजून आम्ही आमच मार्गक्रमण चालू ठेवलं. 
ती अरुंद पायवाट कापत, वर वर सरकत होतो आणि डाव्या बाजूला असलेल्या निसर्गाचा  होतो.  थोड  वर 
जाऊन आता उजवी कडे वळायचं होतं. त्या कोपऱ्यावर उभ राहून डावी कडे दरीच्या बाजूला असलेले  
अप्रतिम दृश्य  न्याहाळू लागलो. वातावरणात  चांगलाच  गारवा पसरलेला होता. दूर पर्यंत डोंगरांची रांग  
पसरलेली होती आणि त्यांच्या  पायथ्याशी घनदाट असे जंगल होते.  खाली छोट्या छोट्या टेकड्या दिसत 
होत्या हिरव्या  गवताने मढलेल्या. डोंगरांचे आभूषण हेच... हिरव्या  रंगांचे. किती आनंद होतो आपल्याला ते 
पाहून, हिऱ्या मानकाची चमक फारच फिकी वाटते ह्यांच्या समोर. तिथे वाहणारा वारा पण किती आनंदी  
वाटत होता, बेधुंध अश्वासारखा सगळी कडे पळत होता आणि हे हिरवे गवत त्याच्या तालावर नाचत होते 
समुद्रातल्या असंख्य नाजूक लाटांसारखे. दरीच्या पुढच्या बाजूला काळ्या रंगाचे उंच असे डोंगर होते, पावसाने 
त्यांच्या वरची सगळी  धूळ धुवून त्यांना त्यांचा खरा रंग प्राप्त करून दिला होता. वाटले हि का एक रम्य नगरी 
आहे?  म्हणजे  तसंच वाटत होतं. ते डोंगर  समोरून सुरु होऊन अर्ध वर्तुळाकार फिरून पुढे पर्यंत पोहोचलेले. 
थोडे  दिसत होते आणि त्यांचा थोडा भाग धुक्याने वेढलेला होता. ते धुकं सोडतच नव्हतं  त्या पर्वतांना. त्या 
गार मिठीतून ते  डोंगर मुद्दामून डोकं वर काढू पाहत आणि लगेचच धुक्याने त्याचा तो पण भाग व्यापून 
घ्यावा. असाच  खेळ चालू होता. कुठे एका काळ्या कुट्ट डोंगरावरून एक नाजूकसा धबधबा  कोसळतांना दिसत 
होता. जणू शुभ्र दुधाची धारच. आम्ही  भरपूर आस्वाद घेतला त्या दृश्याचा.
पुढे जात असतांना  आता उजवी कडे परत पायऱ्या लागल्या. काही व्यवस्थित दगडाने रचलेल्या होत्या आणि 
काही  सिमेंटच्या. थोडी  वळणे घेत त्या अगदी वर पर्यंत जात असलेल्या दिसल्या. खिंडीतल्या रस्त्या सारखा 
वाटत  होतं ते, म्हणजे दोन्ही बाजूला दगडी भिंती/कडे आणि मधून हि वाट. त्या पायऱ्यांवरून अगदीच स्वच्छ 
आणि थंड पावसाचे पाणी खाली वाहत होतं. त्या पाण्याबरोबर खेळत आणि फोटो काढत  पुढे चाललो होतो. 
खूप वेळ त्या पायऱ्या चढत होतो, चांगल्या स्थितीत होत्या सगळ्या म्हणून विशेष असे काही कष्ट नाही पडले 
त्यांना पार करण्यासाठी . वर जाता जाता ती खिंड जरा  निमुळती होत गेली. शेवटच्या टोकावर पोहोचलो 
आणि मग तिथून काढलेले हा फोटो. 
खिंड संपली. त्या खिंडीतून  चालतांना नक्कीच कोणत्या तरी विशेष ठिकानी चाललो आहोत अस वाटायला 
लागलं. त्या रम्यनगरीतून  निघून जणू काही स्वर्गात प्रवेश करत होतो असाच थोडा अनुभव आला. आता  डावी कडे वळालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. पुढचा मार्ग थोडा सोपा वाटला कारण आता  दूर पर्यंत 
बघू शकत होतो. दूर म्हणजे इतकं पण दूर नाही कारण हलक्या पावसाच्या सरी कोसळत  होत्या आणि 
त्यातल्या त्यात धुकं पण चांगलच पसरलं होतं.


क्रमशः 


Tuesday, October 2, 2012

श्रीक्षेत्र बनेश्वर..

मागच्या महिन्यात एक दोन ठिकाणी गेलो होतो फिरायला पण यार लिहिणं होतंच नव्हतं. थोडं थोडं लिहून सेव करून ठेवलं होतं. आज भेटला वेळ. असो... आता पुढे प्रमुख लिखाणाकडे.
       
किती दिवस झालेत 'बनेश्वर' ला जाऊ म्हणत होतो आणि मागच्या महिन्यात ती संधी चालूनच आलीबनेश्वर काही दूर नाही पुण्यापासून ५०-५५ किमी असेलवातावरण छानआल्हाददायक होतंआणि स्वच्छ निळ आकाशपुण्यातून चालतांना आजू बाजूला मोठ मोठ्या इमातरी ह्या तुमच्या साथीदार असतात पण पुणे सोडलं रे सोडलं तुमचे साथीदार बनतात ते मोठ मोठे डोंगरजे खूप लांब पर्यंत तुमची साथ सोडत नाहीतबनेश्वर ला जाण्याचा रस्ता अगदी सरळ म्हणजे सातारा  हायवे ला लागायचं आणि नसरापूर फाट्यावरून उजवी कडे वळायचं३-४ किलोमीटर थोडं गावातून गेलं कि उजव्या बाजूला 'श्रीक्षेत्र बनेश्वर' ची कमान दिसेल. डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो तुम्हाला 'राजगड' कडे घेऊन जायील, म्हणजे बनेश्वर पासून ३५- किमी असेल

वाट कशी सरली काहीच कळलंच नाही आणि पोहोचताच जोरात पाऊस सुरु  झाला. ह्या वर्षी किती पाऊस झाला ते तर सगळ्यांनाच माहित आहे. मग वाटलं परत ह्या ऋतूत असा चान्स नाही भेटणार, कारण परत हा पाऊस दिसतो दिसतो घ्यावं भिजूनतसंच पोहोचलो मंदिराजवळचारही बाजूनी हिरव्या झाडांनी वेढलेलं होतं तेतिथे पोहोचता पोहोचता 'बनेश्वर' नावाचा अर्थ समजू लागला, जाणवू लागला


मंदिराच्या आत जायला निघालो. काही पायऱ्या खाली उतरलो  कि समोर अवतरते ते अगदी पिवळ धमक शिव मंदिर, जसं काही ताज्या पिवळ्या हळदीचा लेप आताच दिलायहे मंदिर शिवगंगा ह्या नदीजवळ वसलेलं आहे. पेशव्यांच्या काळात सगळी बांधणी वगैरे झाली. पेशव्यांची अशी इच्छा होती कि शहरापासून जरा दूर पवित्र भगवद दर्शन आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांतता पण लाभावी अशी एक जागा असावी. त्यातूनच मग हे बनेश्वर अवतरलेमंदिरा समोर दोन छोटे तळे होते, मोठ्या हौदा सारखे. त्यात मासे आणि कासव होते. त्यात असलेल्या पाण्याची व्यवस्था फारच विशिष्ठ होती, इतकं पाणी येत त्यात पण कुठे जाते ते कळणार नाही.  आजू बाजूला काही छोटे छोटे मंदिर होतेमंदिरात गेलो दर्शन घेतलं. इथले शिवलिंग जरा वेगळे आहे असे म्हणतात. त्यात एका मोठ्या शिवलिंगात छोट्या छोट्या शिवलिंग आहेत. काही ठराविक वेळीच ते वरच शिवलिंग  बाजूला करतात आणि आतल्या लिंगांची पूजा होते

छान पैकी दर्शन झाले आणि मग निघालो मागच्या बाजूला जिथे धबधबा होताझाडांमधून छान रस्ता बनवलेला होता नदीकडे जाण्यासाठीत्या वाटेवर भरगच्च झाडे होती पण अतिशय सुरेख मांडणी केलेली. नियोजन खरच छान होतं. १०-१५ मिनिट चाललो आणि नदी किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. भरपूर पाऊस पडून गेलेला दिसला म्हणून सगळी कडे चिखलच चिखल दिसत होता. नदी पात्रात जाण्यासाठी १५-२० फुट खाली उतरून जावं लागणार होतं. भरपूर लोक तिथे वरच उभे असलेले दिसले. कारण माझ्या समोरच - जन खाली उतरतांना धपकले होते. कुणी हिम्मत करत नव्हतं. पण वाटलं कि इतक्या दूर आलो आहे आणि मग इथूनच परत जाणं मनाला पटणारं होतं. केली हिम्मत कशी तरी हळू हळू, झाडांना पकडत उतरलो खाली. छोटासाच रस्ता होता हो तो फक्त चिखलामुळे  जरा अवघड वाटत होता बाकी काही अवघड नव्हतं. असो. पोहोचलो एकदाचं नदीत.       
  
मागच्या वेळी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा पाणी फारच कमी होतं, त्या मुळे पाण्यात पाय टाकून बसण्याची इच्छा पुरे पूर पूर्ण करून घेतली होती. आता पाणी फारच जास्त होतं हो, चांगलंच जोरात वाहत होतं ते. आता जर का हिम्मत केली तर एखाद्या तृणा सारख मला वाहत घेऊन गेला असता तो प्रवाह असे स्पष्ट संकेत होते. म्हणून वाहतं पाणी सोडून जो काही रिकामा खडक होता त्यावर उभा राहून निसर्गाचा आनंद घेऊ लागलो. फारच कमी लोक होते खाली बहुतेक वर सांगितलेल्या कारणामुळेधबधबा तसा छोटासाच होता पण पाणी जास्त असल्याने त्याने आकार वाढवला होता. उजवी  कडे बघितलं  तर हि नदी जंगलातून  रस्ता काढत येत असलेली दिसते. नदीच्या मार्गात खडक पण भरपूर होते, मधूनच ते नदीच्या पाण्यातून वर डोकावतांना दिसायचे आणि कधी कधी ते पाणी त्यांना परत पाण्यात बुडवून टाकायचे. मग हि नदी डावी कडे ह्या धबधब्या तून  कोसळून  पुढे मार्गक्रमण  करत असतांना दिसते
       
अप्रतिम निसर्गाचा आस्वाद घेत उभे होतो आम्ही. आणि त्यातल्या त्यात हा जोरात वाहत असणाऱ्या पाण्याचा आवाज.  पाण्याचा खळ खळ आवाज किती मस्त वाटतो आपल्याला, भलेही तो आवाज छोटेखानी झऱ्याचा असो किव्वा उंचा वरून कोसळणाऱ्या धबधब्याचा. मन प्रसन्न होणार म्हणजे होणारच. आजू बाजूचा निसर्ग पण त्या धबधब्याच्या सुंदरतेत भर घालत होता. समोरच्या बाजूला, म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला छोटे छोटे डोंगर होते अगदी हिरवे गर्द. काय नजरा होता यार, दिल खुश. खूप वेळ गेला यात, म्हणजे हरवल्यावर वेळ कसा जातो ते जसं कळत नाही तसा वेळ गेला :) भारी भारी पोज मध्ये फोटो काढून घेतले आणि हि हिरवी आठवण मनात साठवून परतीच्या मार्गास लागलो.  

खरच 'बनेश्वर' हे त्याच नाव सार्थक करून दाखवतं अगदी तुम्ही मंदिराच्या परिसरात आगमन करतात त्या क्षणा पासूनच. एक दिवसाच्या फिरस्ती साठी अगदी छान जागा आहे, पावसाळ्यात/ हिवाळ्यात एकदा तरी भेट द्यावी अशी.