आता जिथून जात होतो तो रस्ता एकदम मस्त होता म्हणजे सरळ आणि सावलीचा. डाव्या बाजूला मागे सांगितल्या प्रमाणे मोठा काळ्या दगडाचा डोंगर आणि उजव्या बाजूला खोल दरी. फार दिवसांनी अस कुठे फिरायला आलो होतो म्हणून चालता चालता चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या आमच्या. विनोदने सांगितलेल्या एका इंजीनियरिंगच्या किस्स्यावर तर सगळे पोट धरून हसायला लागलो. तो म्हणजे इंजिनियरिंग मध्ये Drawing हा एक विषय असतो. त्यात आपल्या हाताने वेगवेगळी इंजिनियरिंग रिलेटेड चित्रे काढायची असतात. पण विनोदला भलताच कंटाळा ह्या गोष्टीचा. तो वेगळाच चोर मार्ग वापरायचा जो कोणत्याच शिक्षकाला आवडत नाही तो म्हणजे GT (ग्लास ट्रेसिंग ). यात ज्याने पहिले ते चित्र काढलेलं असत त्याचं ते drawing आणायचं आणि त्यावर आपला कोरा पेपर ठेवून फक्त ते कॉपी करायचं. मस्त short कट आहे हा. विनोदने कधीच स्वतःहून असं माप घेऊन त्या आकृत्या नाहीत काढल्या कायम हाच चोरीचा मार्ग वापरायचा आणि गम्मत म्हणजे त्याची आई आणि बहिण ह्या दोघेही त्याला फार मदत करायच्या ह्या कामात, बिच्याऱ्यांना वाटायचं आमचा पोरगा किती मेहनत घेतो आहे असं चित्र काढायला, पण खरा किस्सा तर वेगळाच असायचा. लई हसवलं विनोदने ह्यावर.
ह्या हसी मजाक मध्ये वेळ कसा जात होता काही कळत नव्हतं. भरपूर सरळ चालत थोडं वर वर पोहोचलो. डाव्या बाजूला वळालो. आता समोर एक कोरडा काळा खडक होता. खरतर तो एक धबधबा होता. खूप दिवस पाणी वाहून गेल्या नंतर जमिनी खालचा काळा खडक दिसायला लागतो ना तसाच होता हा. आमच्या उजव्या बाजूला खोल दरी होती म्हणजे पावसाळ्यात ह्या खडकावरून पाणी चांगलंच जोरात वाहत जाऊन खाली पडत असणार, डायरेक्ट जंगलात आणि पुढे नदीत रुपांतर होतं असणार. आता जिथे आम्ही उभे होतो तो जरा दरी सारखा भाग होता. म्हणजे डाव्या बाजूला डोंगर, समोर म्हणजे ह्या धबधब्या पलीकडे त्याला लागुनच दुसरा डोंगर होता आणि आमची वाट होती ती ह्या धबधब्याला धरून डाव्या बाजूला वर जायची. थोडी सरळ सपाट नदीची वाट आणि परत पुढे डोंगर दिसत होता. म्हणजे आम्हाला ह्या दोन डोंगरांमधून जायचं होतं. आता पाणी नसल्याने मजा वाटत होती त्या कोरड्या नदीतून चालायला पण पावसाळ्यात कसं होत असणार काय माहित?
बिबटे आहेत का रे इथे?
पहिले होते आता न्हायीत, पळून गेलेत
कुठे ?
रान डुकरांना घाबरून दुसऱ्या जंगलात .
आयला, असं कसं? रान डुक्कर इतके डेंजर असतात ?
अहो २००-२०० किलोच असतं १-१. डायरेक्ट फाडून टाकतात बिबट्यांना.
..गम्मतच आहे. हे तर अजिबात माहित नव्हतं. किती रानडुक्कर असतील इथे ?
२०-३० आहेत बघा.
अरे बापरे... मग कसले राहतात बिबटे इथे ..पळणारच ते.. असो.. अश्याच थोड्या गप्पा मारून आम्ही उठलो आणि निघालो वर. बऱ्याच गप्पा चालू होत्या म्हणजे आम्ही त्याला विचारल कि वर तुमच्या हॉटेल मध्ये काय काय असतं खाण्यासाठी? किती लोक येतात नेहमी? गर्दी कधी असते? वगैरे वगैरे. तुळशीराम सगळी माहिती देत होता म्हणजे सरबत, ताक भेटतं पिण्यासाठी. जेवण्यासाठी भाजी भाकर, पिठलं भात करून भेटत वगैरे आणि त्या रिलेटेड मस्त किस्से सांगत होता. एक किस्सा त्याने सांगितला कि एकदा काही पुण्याचे लोकं वर नॉनवेज बनवत होते, आम्ही म्हणलो त्यांना कि इथे देवाजवळ नका काही करू वाटल्यास लांब जाऊन करा. पण ते काही ऐकत नव्हते, दम दाटी कराया लागले. आम्ही केला मग फोन खाली गावात अन आले कि आमचे १५-२० जण लाठ्या घेऊन आणिमग चांगलाच हाणला त्यांना. (नो comments)
अजून असे बरेच किस्से सांगितले. असं बोलता बोलता बरच वरती येऊन पोहोचलो आणि आणि आता लांब पर्यंत बघू शकत होतो. दूर आणखी एक डोंगर दिसला तुळशीराम म्हणाला कि तो 'तारामती' आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या नम्बरच शिखर आणि तिथे काळ्या खडकात देवाचं मंदिर. इतक्या दिवसांपासून इच्छा होती कि गडावर जावं, ते मंदिर बघावं. खूप पुस्तकात, खूप ब्लॉग्स वर, गुगल वर खूप वाचलं होतं, खूप फोटो पाहिले होते. किती दिवसांची ती इच्छा आज पूर्ण होणार होती. म्हणून तिथे जाता जाता पाय जरा जोरात पडायला लागले होते.